पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उज्ज्वला



 लौकिकार्थाने अ‍ॅलिस मेलेलीच आहे.पण वैद्यकशास्त्रानुसार अजून थोडी धुगधुगी उरली आहे. ती विझून जायची वाट पाहत आम्ही बसलोय. कुणी तरी मरण्याची वाट पाहत असं बसणं हे किती भयानक असतं.

 फ्रेनी माझ्याशेजारीच बसलीय. ती इथे का आलीय मला समजलंच नाही. काय चाललंय तिच्या मनात? ॲलिस आपल्या डोळ्यांसमोर मरताना पाहण्यात तिला काही समाधान लाभतंय? खरं म्हणजे ती ह्या सगळ्याच्या पलिकडे गेलेली असायला पाहिजे. जगरहाटीनुसार ती अ‍ॅलिसच्या आधीच जायची, रुस्तुम गेला तेव्हा. पण ती जगली, जगत्येय. कशासाठी माहीत नाही. आयुष्यातला केवढा तरी भाग ॲलिसचा द्वेष करण्यात, तिच्यावर मात करण्याच्या प्रयत्नात तिने घालवला. पण रुस्तुम मेल्यावर ह्या सगळ्यालाच अर्थ उरला नाही. कदाचित ते तिला शेवटी उमजलं असेल आणि तिचं इथे येणं म्हणजे एक मुकी क्षमायाचना असेल की काय कोण जाणे. फ्रेनीच्या बाबतीत मी कोणतेच आडाखे ठामपणे बांधू शकत नाही.

उज्ज्वला - १