पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टाकली असती त्यांनी. ते एका उंच झाडावर बसले होते. मी लांबनंच त्यांना बघून माझी वाट बदलली."
 "झाडावर ?"
 "हो."
 "मी आत्तापर्यंत कधीच झाडावर लपून बसलेली माणसं बघितली नाहीत. दरोडेखोर तर नाहीच नाही. शिवाय तुला लांबनंच त्यांचं बोलणं ऐकायला आलं म्हणजे ते खूपच मोठमोठ्याने बोलत असले पाहिजेत."
 "तर काय."
 तिनं माझ्या चेष्टेच्या सुराकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. तसं पाहिलं तर ती सांगायची त्या गोष्टींत तथ्य असण्याची छोटीशी शक्यता होती, पण माझा तिच्यावर विश्वास बसला नाही एवढं खरं. ती नुसती गंमत म्हणून असले बनाव करायची की आपल्या आयुष्यात खूप चमत्कारिक आणि थरारक घटना घडतात असं दाखवणं ही तिची मानसिक गरज बनली होती हे मला कळलं नाही. पण ह्या गोष्टींचा आमच्या संबंधात एक अडसर होऊन बसला एवढं खरं.
 रुस्तुम गेल्यावर मी प्रथमच ॲलिसला भेटलो, तेव्हा ती खूप खिन्न दिसली. तो मरताना आपण त्याच्या जवळ असायला हवं होतं असं तिला फार वाटत होतं. कधी नव्हे ते ती त्याच्याबद्दल बोलत होती, पण हरवल्यासारखी वाटत होती. तिच्यापासून दूर का होईना, पण तो होता. आता त्याचं अस्तित्वच संपल्यावर त्यांच्या आयुष्यात काही बदल होईल ही आशाच मालवली होती. अशी आशा तिच्या मनात अजून जिवंत होती याचं मला आश्चर्य वाटलं.
 तिच्या स्वभावानुसार तिला सावरायला फारसा वेळ लागला नाही. पूर्वीप्रमाणे आम्ही भेटत, गप्पा मारीत, वाद घालीत होतो. मला वाटलं होतं, रुस्तुम गेल्यावर ती कदाचित माझ्याबद्दल वेगळा विचार करू शकेल. पण आमच्या नात्यात काही बदल हवा असं तिनं दूरान्वयानेही सुचवलं नाही आणि मला तसं सुचवण्याचा धीर झाला नाही. कारण आहे ते नातंही उसवेल अशी मला भीती वाटली. तेव्हा

४० - ॲलिस