पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दुसऱ्या कुणाला माहीत नाही असा मला अभिमान होता. पण तिनं मला अशी ठिकाणं दाखवली की, जिथे मी कधी गेलो नव्हतो. एकदा पठारावरून शंभरेक फूट धडपडत खाली उतरायला लावून तिनं मला झाडाझुडपांत बेमालूम लपलेली एक गुहा दाखवली.
 "तुला कशी सापडली ही ?"
 "एकदा मी तिकडून येताना इथे एक माणूस पाहिला. कड्याजवळ येऊन खाली डोकावले तर तो नाहीसा झाला होता. तो वर आला असता तर मी उभी होते तिथूनच त्याला यावं लागलं असतं. खाली गेला असता तर कुठल्या तरी पायवाटेवर दिसला असता. मी ह्या प्रकाराचा छडा लावायचा ठरवला. आपण आत्ता आलो तशीच मी खाली उतरले तर मला हे गुहेचं तोंड दिसलं. आत तो माणूस होता. तो एक साधू होता. ध्यानधारणेसाठी इथे येऊन बसतो म्हणाला."
 "मग आता कुठेय?"
 "गेला असेल बाहेर कुठे."
 मला त्या गुहेत मनुष्याच्या अस्तित्वाची किंवा वस्तीची काहीच खूण दिसली नाही. वटवाघळांचा वास मात्र येत होता. मी तिच्याकडे जरा रोखून पाहिलं पण तिच्या चेहऱ्यावर ती चेष्टा करतेय असा काही भाव दिसला नाही. त्यावेळी मी ते सोडून दिलं, पण पुढे दोन-तीनदा मला ह्या प्रसंगाची आठवण झाली. एकदा फिरायला जाताना जंगलात अजगर दिसला असं ती म्हणाली. एकदा बिबळ्या दिसला. पण लपून बसलेले दरोडेखोर दिसले असं जेव्हा ती म्हणाली, तेव्हा माझ्याच्याने राहवलं नाही.
 मी विचारलं, "तुला कसं कळलं ते दरोडेखोर आहेत म्हणून ?"
 "त्यांचं बोलणं ऐकलं मी. कुठेतरी दरोडा घालण्याबद्दल बोलत होते."
 "मग तुला पाहून ते पळून गेले ?"
 "पळून कुठले जाणार ? मला पाहिली असती तर मारून

रॉबर्ट – ३९