पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ती "असं !" एवढंच म्हणाली. कदाचित तिला ती फारसा रस घेण्याजोगी वाटली नसेल. ज्युलिया काळी, स्थूलतेकडे झुकणारी होती. ती केसांचा चापून-चोपून अंबाडा घालायची. एक साधीशी साडी नेसायची. चांगले-चुंगले कपडे करण्यात, दागिन्यांनी मढण्यात तिला रस नव्हता. ॲलिस सुद्धा नखरेल होती असं नव्हे, पण तिच्यात एक नैसर्गिक डौल होता. तिचे साधेच वाटणारे कपडे, फ्रॉक असो किंवा पँट असो, स्टायलिश दिसायचे. कदाचित ती ते मुंबईतल्या एखाद्या महागड्या शिंप्याकडून शिवून घेत असेल. ह्या प्रांतातलं मला काही कळत नाही, पण माझ्या ज्युलियापेक्षा ती अगदी वेगळीच होती एवढं मात्र मला लगेचच कळलं. ज्युलिया शांत, सौम्य होती. ॲलिसच्या सहवासात उत्तेजना असे. ती येऊन गेली की, कोंडलेल्या वातावरणात एकदम वारा सुटल्यासारखं वाटायचं
 ती हिंदुस्थानात आली तेव्हा कशी दिसत होती ते मला पहायचं होतं. जीवनानंदाने पूर्ण भरलेल्या उमलत्या फुलासारखी ? तिच्या खूप मागे लागलो तेव्हा तिनं आपल्या तरुणपणचा एक फोटो आणून दिला, पण त्यात दिसणारी मुलगी ॲलिस नव्हती. ती एक दहा तरुण मुलींसारखी, कॅमेऱ्यानं बुजलेली, जिवणीवर फोटोसाठी आवश्यक असलेलं स्मित चिकटवलेली मुलगी होती. फोटो न्याहाळून झाल्यावर मी वर पाहिलं तो ती मिस्किलपणे हसत होती.
 "म्हणूनच मी इतके दिवस तुला दाखवीत नव्हते. मोठेपणी भेटलेल्या माणसांचे तरुणपणचे फोटो कधी बघू नये. लहानपणचे तर नाहीच नाही."
 मी काही न बोलता फोटो तिला परत दिला.
 तिला भटकायची फार हौस होती आणि माझ्या वयामुळे आणि लहानसहान दुखण्याखुपण्यांमुळे माझ्या चालण्यावर मर्यादा येत असल्या तरी ती कधीकधी मला ओढून आपल्याबरोबर न्यायची. मी रायरेश्वरावर खूप भटकलो आहे आणि हे पठार माझ्याइतकं

३८ - ॲलिस