पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि कुत्र्याचा पट्टा हातात अशी समोर न बघता चालली होती. माझ्यासमोर दोन वितींवर स्वतःला लगाम घालीत म्हणाली, "सॉरी." मग हसून म्हणाली, "तू रॉबर्ट ......."
 "आणि तू ॲलिस ......."
 मान होकारार्थी हलवून ती मोठ्याने हसली. "आपण कधीतरी भेटणार हे विधिलिखितच होतं. इथल्या लोकांच्या मते एका देशातले म्हणजे खरं आपली आधीपासूनच ओळख असायला हवी होती. आपली भेट सुद्धा झाली नाही असं म्हटलं की त्यांना फार आश्चर्य वाटतं."
 "अगदी माझाच अनुभव सांगितलास."
 तिनं मला तिच्याकडे चहाला नि गप्पा मारायला नेलं. तिच्या गाडीत बसायचं म्हणजे तिच्या कुत्र्यांचे उष्ण श्वास आणि लाळ मानेवर झेलीत बसावं लागतं आणि तिच्याबरोबर फिरायला जायचं म्हणजे एकदा तरी त्यांच्या पट्ट्यांत गुंतून धडपडावं लागतं हे मी लवकरच शिकलो.
 एकदा मी तिला विचारलं, "तू ह्या कुत्र्यांना शिकवीत का नाहीस? त्यांच्या बेशिस्त वागण्याचा तुला त्रास नाही होत ?"
 तिनं माझ्याकडे जरासं आश्चर्याने पाहिलं. "नाही. त्यात त्रास कसला ? त्यांना मी पिल्लं म्हणून आणलं तेव्हा मी त्यांच्यापाशी फार वेळ राहू शकत नव्हते आणि आता ती फार मोठी झालीत." अर्थात ती जातिवंत कुत्री नव्हती आणि कितपत शिकू शकली असती कुणास ठाऊक.
 सुरुवातीला आमची ओळख झाल्या-झाल्या ती स्वतःबद्दल बोलायला नाखूष असे. हळूहळू तुकड्यातुकड्यांनी, कधी एखाद्या प्रश्नाचं सरळ उत्तर मिळून, कधी सहज काढलेल्या एखाद्या उद्गारातून तिचं आयुष्य मला कळत गेलं. ती माझ्या पूर्वायुष्याबद्दल मात्र फारसं कुतूहल दाखवीत नसे. माझ्याकडे टेबलावर माझ्या बायकोचा फोटो होता तो मी तिला दाखवला, "ही माझी बायको."

रॉबर्ट – ३७