पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कधी कबूल केलं नाही कारण ती फार मानी होती. एकदा मी तिला रुस्तुमबद्दल विचारलं होतं.
 ती म्हणाली, "त्याला सोडून देऊन काय करू ?"
 "माझ्याशी लग्न कर."
 "तुझ्याशी लग्न ?" ती मोठ्याने हसली. ती एखादी घोडी खिंकाळल्यासारखी हसायची. "एवढा चेहरा पाडू नकोस. तसं तुझ्याविरुद्ध माझं काही नाही. पण तुझ्याशी लग्न ही कल्पनाच विनोदी आहे."
 "का ?" मी शांतपणे विचारलं.
 "तू जरासा विचार केलास तर तुला ते कळेल. तुझ्याशी लग्न करून मला काय मिळणार आहे ? तू आधी कुणाच्या तरी कृपेवर इथे रहातोस, तुटपुंज्या पेन्शनवर जगतोस. माझ्याकडे स्वतःचं असं काही नाही. जे आहे ते रुस्तुमची बायको म्हणून. आयुष्यातलं सगळं स्थैर्य, सुरक्षितता फेकून देऊन तुझ्याशी लग्न करायला माझं तुझ्यावर प्रेम तरी असायला हवं ना ?"
 "पण माझं तुझ्यावर आहे ना. तेवढं पुरे आहे मला."
 "मला नाहीये."
 मी आशा सोडली नव्हती. एकटेपणा भोगलेल्या माणसाला दुसऱ्याचा एकटेपणा चटकन समजतो. तिच्या स्वच्छंदी वृत्तीमागे, हसून खेळून वागण्यामागे एकाकीपणाची, रुस्तुम करीत असलेल्या अवहेलनेची सल होती ती मला लगेच जाणवली होती. मृगजळामागे लागण्यात उरलेलं आयुष्यही घालवण्याऐवजी आज ना उद्या मी जे देऊ केलं होतं ते ती स्वीकारील अशी माझी खात्री होती. पण ती फोल ठरली.
 आम्ही खूप अगोदर भेटायला हवं होतं. खरं म्हणजे आम्ही एकाच जातकुळीचे होतो आणि एकमेकांना लगेच ओळखलं असतं, जसं त्या दिवशी रायरेश्वरच्या बाजारात आमची जवळजवळ टक्कर झाली तेव्हा ओळखलं तसं. ती एक पिशवी खांद्याला, एक पिशवी

३६ - ॲलिस