पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ॲटॉमिक रेडिएशनमुळे येणाऱ्या मरणाला एक-एक करून सामोरे जातात असं कथासूत्र आहे. ॲलिस त्या कादंबरीतलं पात्र बनू शकली असती.
 आम्ही खूप गप्पा मारल्या. काय आणि कशाबद्दल बोललो ते सगळं आठवत नाही. आठवतं एवढंच की, मी विचारलं, "ॲलिस, तू अगदी तरुण असताना, भविष्यकाळाबद्दल सारासार विचार सुद्धा करण्याची कुवत नसण्याच्या वयात एक तडकाफडकी निर्णय घेऊन आपला देश सोडलास, त्याचा तुला कधी पश्चात्ताप झाला का ग?"
 "कधीच नाही."
 "मनात आणलं असतंस तर तुला परत जाता आलं असतं ?"
 ती मोठ्याने हसली. "म्हणजे माझा परतीचा मार्ग बंद झाला होता म्हणून मी असं म्हणतेय असं तुला म्हणायचंय ? मी परत जाऊ शकले असते. त्यात काही अडचण आली नसती, पण मी कधी तसा विचार केलाच नाही."
 खऱ्या अर्थाने तीच आमची शेवटची भेट.


- ★ -

उज्ज्वला – ३३