पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ती थोडीशी हसली. "ते समजायला तुला रुस्तुम भेटण्यापूर्वीचं माझं आयुष्य माहीत असायला पाहिजे."
 "थोडंफार माहीताय मला."
 "इकडून तिकडून ऐकलं असलंस तर ते काय ह्याची मला कल्पना आहे. पण आता माझ्याकडून ऐक. मी इथे आले ती भाबडी, स्वप्नाळू, हिंदुस्थानाबद्दलच्या रोमँटिक कल्पना मनात बाळगलेली तरुण मुलगी होते. अज्ञातात उडी तर घेतली होती, पण इथे येऊन पोचल्यावर खूप भीती वाटायला लागली. माझ्या बॉसने दोन-तीन नावं दिली होती तेवढाच फक्त आधार होता, पण हळूहळू ओळखी

होत गेल्या आणि मी रुळायला लागले. ब्रिटिशांपेक्षा सुद्धा इथल्या हिंदी लोकांनी मला किती चटकन आपल्यात सामावून घेतलं. अगदी थोड्याश्या ओळखीवर सुद्धा कितीजण मला घरी बोलवायचे, पाहुणचार करायचे, हरतऱ्हेनं मदत करायचे. मी परदेशीय आहे असं मला वाटेनासंच झालं, पण ह्या सगळ्याला एक मर्यादा असते हे मला समजलं नाही. मी एकाच्या प्रेमात पडले. माझ्याशी लग्न करण्याचा त्याचा कधीच इरादा नव्हता हे मी सोडून बाकी सगळ्यांना ठाऊक होतं. मला कळलं तेव्हा त्याचा धक्का मोठा होताच, पण चार लोकात माझं हसं झाल्याचा अपमान जास्त तीव्र होता. मी स्वतःशी खूणगाठ बांधून ठेवली, कुणाही पुरुषात गुंतायचं नाही. आणि मग रूस्तुमसाठी मला परत कोलांटी मारावी लागली. मी त्याला इतरांप्रमाणेच चार हात दूर ठेवीत होते. प्रथम त्याने मला लग्नाचं विचारलं तेव्हा मी ते चेष्टेवारीच घालवलं. पण त्याने माझा नकार मानलाच नाही. शेवटी त्याच्या चिकाटीपुढे मी स्वतःभोवती बांधलेल्या संरक्षक भिंती कोसळून पडल्या. नंतर काहीही झालं तरी हे मी विसरू शकत नाही. बाकीच्यांनी मला नुसतं वापरलं. रुस्तुमने माझा परकेपणा, इथे वेगळेपणानं उठून दिसणारं माझं रंग-रूप ह्यांच्याखाली असलेल्या माणसाची कदर केली. माझा हरवलेला आत्मविश्वास, आत्मसन्मान मला परत मिळवून दिला. त्याचं मोल कशातच करता येणार नाही."

उज्ज्वला – ३१