पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जे काय करायचं ते सगळं तिनं जातीनं केलं पाहिजे असं तिला वाटत होतं. साधं औषध काढून दिलं तर 'बघू ती बाटली. किती गोळ्या दिल्यास?' असं संशयानं विचारायची. शेवटी मला हे सगळं असह्य झालं. रुस्तुमलाही त्याचा त्रास होत होता. तेव्हा मी निघून जायचं ठरवलं. त्याला गुडबाय करताना मी त्याला सांगितलं, 'तू बघतोयस माझी कशी कोंडी होतेय ती. आत्ता ह्यावेळी मला फ्रेनीशी भांडायचं नाही आणि तूही तिला काही म्हणावंस अशी माझी अपेक्षा नाही. तेव्हा मी इथून जाणंच बरं. तुला डॉक्टरांनी प्रवासाची परवानगी दिली की, मी तुला रायरेश्वरला घेऊन जाणार आहे. मग तिथल्या हवेनं बघ तुझी प्रकृती कशी भराभर सुधारते ती.' पण उजू, आत कुठेतरी वाटत होतं की, ही शेवटचीच भेट. तो म्हणाला, 'रडू नको ॲलिस. आयुष्यात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणापलिकडच्या असतात. मी तुला हवं ते कदाचित देऊ शकलो नसेन, पण एवढं मात्र लक्षात ठेव, मी नेहमीच तुझ्यावर प्रेम केलंय आणि ही गोष्ट कशानेही पुसून जाणार नाही. म्हणजे त्यालाही कळलं असावं की आता आम्ही परत एकमेकांना भेटणार नाही. हे निरोपाचंच बोलणं होतं."
 रुस्तुम खरंच असं म्हणाला असेल की नाही ह्याची मला शंका वाटली. गेली काही वर्षं तरी त्यांच्यातले संबंध खूपच दुरावले होते. कोण जाणे, कदाचित मृत्यूची चाहूल लागल्यावर माणसं जास्त भावनाप्रधान बनत असतील किंवा तिच्या आठवणीत रुस्तुम हा असा ठेवायचा असला तर तशी तिला मुभा होतीच.
 मी विचारलं, "ॲलिस, रुस्तुम तुझ्याशी असं वागला, प्रत्येक वळणावर फ्रेनीनं तुझी अडवणूक केली नि ती त्यानं मुकाट्यानं करू दिली. तरी तू त्याला धरून का राहिलीस? तू स्वतंत्र होतीस, स्वतःचं पोट भरू शकत होतीस. बरं, त्याच्यापासून वेगळं होण्याचा तुला मोठा बाऊ वाटत असेल असं मला तरी वाटत नाही. मग का ?"

३० - ॲलिस