पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "तिला कळवलंय ना?"
 "कशाला कळवायचं ? तिला त्याच्याबद्दल काही वाटत असतं तर त्याची प्रकृती अशी असताना ती त्याला सोडून गेलीच नसती."
 "पण फ्रेनी, काही झालं तरी ती त्याची बायको आहे. तो गेल्याचं तिला नुसतं कळवणार सुद्धा नाही तुम्ही ?"
 फ्रेनी काहीच बोलली नाही. ॲलिसला कळवायचा तिचा इरादा नव्हता हे उघड होतं. मग मीच ॲलिसला फोन केला. ॲलिस येईपर्यंत अंत्यविधी आटोपले होते. ती माझ्याकडे आली तेव्हा रात्र झाली होती. तिनं विचारलं, "मी आज तुझ्याकडे राहिले तर चालेल ?"
 "अर्थात."
 "फ्रेनीला भेटून आले. वाटलं होतं, आता तिला माझा द्वेष करायचं कारण उरलं नाही. पण तिचा दृष्टिकोन वेगळाच होता. मला म्हणाली, 'आपल्यातला रुस्तुम हा एकच धागा होता तो तुटला. आता तुला माझ्याशी संबंध ठेवायचं काही कारण नाही.' बास. गेल्या पावली बाहेर आले."
 ती एकदम रडायला लागली. "त्यांच्या त्या टॉवरमध्ये येऊच दिलं नसतं बहुतेक मला. पण त्याआधी एकदा रुस्तुमला पहायचं होतं. तेवढंही समाधान तिनं लाभू दिलं नाही."
 "रुस्तुम फार आजारी होता का?"
 "आजारी वगैरे काही नाही. त्याला हार्ट अटॅक येऊन गेल्याचं तुला माहीत होतं ना ? त्यातनं उठून तो आता खूपच ठीकठाक झाला होता. तसं पथ्यपाणी होतं. पण त्यावरूनच फ्रेनीचे आणि माझे खटके उडायला लागले. मी त्याला काहीही खायला-प्यायला दिलं की, ते कुपथ्याचं आहे असं ती म्हणायची. डाक्टरांनी थोडा थोडा व्यायाम करायचा सल्ला दिला होता तर, खोलीतल्या खोलीत त्यानं चालावं असं मी सुचवलं तर चक्क मी त्याला मारुन टाकायचा चंग बांधलाय असं म्हणायची. त्याच्यासाठी

उज्ज्वला – २९