पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणत म्हातारीसाठी ताजमधून केक्स आणि चॉकोलेट्स घेऊन यायची. ती म्हणायची, "फ्रेनीनं आपल्या आईकडून हे शिकायला पाहिजे. जी माणसं स्वतः आनंदात जगतात ती इतरांबद्दल किरकिर करत बसत नाहीत. बिच्चारी फ्रेनी !" आपल्याला ॲलिस बिच्चारी समजते हे फ्रेनीला मुळीच रुचलं नसतं. ती ॲलिसला शत्रू समजायची आणि ॲलिसनं आपल्याला शत्रू समजावं अशीच तिची इच्छा होती.
 रायरेश्वरचं घर मालकीचं झाल्यापासून ॲलिस तिकडे बऱ्याच वेळा जायला लागली. कधी रुस्तुम, फ्रेनी असायचे पण बरेचदा ती एकटीच जायची. त्यांची एक जुनी फियाट होती ती एकटीच मुंबईहून रायरेश्वरला चालवीत न्यायची. क्वचित मी तिच्याबरोबर जायची. मला तिच्या घरात तिच्याबरोबर रहायला आवडायचं. तिनं घराभोवतालच्या जागेत फुलशेती केली, मधमाशांच्या पेट्या ठेवल्या. हळूहळू ह्या उद्योगांतून तिला चांगलं उत्पन्न मिळायला लागलं. एकदा ती म्हणाली, "आता फ्रेनीला तक्रार करायला जागा उरली नाही. ह्या घराचा सगळा खर्च मी भागवते. तेव्हा आता किती खर्च होतोय ह्याची काळजी न करता तिला इथे येऊन चांगलं सुखात रहाता येईल." आणि ती खळखळून हसली. ती असा खट्याळपणा करायची, पण त्यात दुष्टपणा किंवा क्षुद्रपणा नसे. फ्रेनी आली की तिच्या आवडीचे पदार्थ करायचे, तिला हवं बघायचं हे ती मनापासून करायची. फ्रेनीला अर्थात ॲलिस आपल्याला आपल्याच घरात पाहुण्यासारखं वागवते ह्याचा राग यायचा.
 ॲलिसनं मला सांगितलं, "तुला माहीताय उजू, हे घर मला जितकं अगदी माझं वाटतं तितकं मुंबईचं घर कधीच वाटलं नाही. अर्थात फ्रेनीनं वाटू दिलं नाही हे तर खरंच. मी येण्यापूर्वीपासून ती त्या घराची मालकीण होती हे तिनं मला कधी विसरु दिलं नाही. घर ती चालवायची नि तिच्या पद्धतीनं चालवायची. त्यात माझ्यासाठी काही फेरबदल करण्यात येणार नाहीत, इथल्या पद्धतीप्रमाणे आहे

उज्ज्वला – २५