पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हती. ती पहिल्यापासूनच इथल्या समाजात जास्त मिसळली. फ्रेनी अर्थात म्हणायची की, गोऱ्या लोकांपुढे गोंडा घोळणाऱ्या समाजात तिला जी किंमत होती ती गोऱ्या लोकांनी तिला कधीच दिली नसती. पण ॲलिसने एकदा मला सांगितलं होतं की, तिला हिंदुस्थानाविषयी, हिंदी लोकांविषयी जबरदस्त आकर्षण होतं. इथल्या स्वातंत्र्यलढ्यासाठी पैसे जमवायला केलेलं कुणाचं तरी भाषण ऐकून ती भारावून गेली होती. तेव्हापासून संधी आली तर हिंदुस्थानात जायचं असं तिनं पक्कं ठरवून टाकलं होतं. तिचे आणि ह्या देशाचे गेल्या जन्मीचे काहीतरी ऋणानुबंध असले पाहिजेत असं ती गंभीरपणे म्हणायची.
 तिला आणि रुस्तुमला प्रथमच एकत्र पाहिलं तेव्हा त्यांचं एकमेकांबद्दलचं आकर्षण मला लगेच जाणवलं. फ्रेनीला ते जाणवलं नाही म्हणून ती गाफील राहिली म्हणा, किंवा रुस्तुमच्या भावना तिचा अडथळा पार करून जाण्याइतक्या तीव्र होत्या म्हणा, रुस्तुमनं ॲलिसशी लग्न केलं तर खरं. त्यानं लग्न करावं की नाही हे जर फ्रेनीवर अवलंबून असतं तर तो कायम बिनलग्नाचा राहिला असता. पण तिच्या विरोधाला न जुमानता लग्न केलं त्यापासून त्याला काय किवा ॲलिसला काय, कितपत सुख लाभलं कोण जाणे. कारण जणू लग्न केलं हा तिचा मोठा अपराध केला, तेव्हा नंतर त्याचं पारमार्जन करण्यासाठी प्रत्येक गोष्ट फ्रेनीच्या कलाने घ्यायची असंच रुस्तुम वागला. ॲलिस आणि फ्रेनी ह्यांच्यातल्या समरप्रसंगात तो अलिप्त तरी राहिला किंवा फ्रेनीच्या बाजूने तरी. ॲलिसच्या बाजूने, अगदी सुरुवातीची काही वर्ष सोडली तर कधीच उभा ठाकला नाही आणि तरीही ह्या लढाईत शेवटी फ्रेनीच जिंकली असं काही म्हणता येत नाही.
 खरं म्हणजे त्यांच्या घरात प्रथम फ्रेनीशीच माझी मैत्री झाली. आम्ही त्यांच्या शेजारच्या फ्लॅटमधे रहायला आल्यापासून मला त्याच्याबद्दल अखंड कुतुहल वाटत असे. त्यांच्या घराच्या सजावटीत विशेष अभिरुची होती. जुनं पिढीजात सुंदर कलाकुसरीचं काळसर

उज्ज्वला - १९