पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षी तिला ख्रिस्मस कार्ड यायचं. त्यात, तिच्याच शब्दात सांगायचं तर, तू कशी आहेस, आम्ही छान आहोत असा मजकूर, कुणाच्या तरी नवीन जन्मलेल्या बाळाचा फोटो, कुणी तरी मेल्याची बातमी असं काही असे. तिच्याकडून तसलंच कार्ड त्याला जायचं. एकदा ती म्हणाली, "आम्ही हे का करतो हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचं आहे. इतके दिवस दूर राहिल्यावर आमच्यात देवघेव करण्यासारखं काही राहिलं नाही. माझं इथलं आयुष्य तर त्याच्या अनुभवाच्या इतकं बाहेर आहे की त्याबद्दल त्याला लिहिणं निरर्थक आहे."
 मी म्हटलं, "पण त्याचं तिथलं आयुष्य तरी तुझ्या ओळखाच आहे ना ?"
 "हो, आहे ना !" आणि ती मोठ्याने हसली. "जे जगण्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी मी इकडे पळून आले ते मला अनोळखी कसं असेल ? गेल्या वेळेला मी तिकडे होते ना, तेव्हा माझ्या मनात सारखं काय येत होतं सांग ? मी त्याच्या जागी नाही हे माझं केवढं नशीब."
 म्हणजे तसं तिच्या भावाचं काही वाईट चाललं होत अस नाही, पण त्याच्या वाट्याला आलेलं एकसुरी आयुष्य तिला जगायचं नव्हतं. काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यात घडावं असं तिला वाटत होतं, आणि ते लंडनमधे बसून घडण्याची सुतराम शक्यता नाही हे दिसत होतं. तेव्हा आपल्याला हवं असलेलं भविष्य आपणच घडवायचं तिनं ठरवलं.
 त्या काळात पुरुषांना तरी नशीब काढायला किंवा चाकोरीबाहेरचं कर्तृत्व दाखवायला एखाद्या ब्रिटिश वसाहतीत जाऊन राहणं हा एक राजमान्य मार्ग होता. बायकाही ह्या मार्गाने जायच्या पण त्या वेगळ्या कारणासाठी. वसाहतीत नोकऱ्या करणारे, व्यापारासाठी आलेले अनेक तरुण असत. त्यांच्यातल्या कुणाला तरी गटवून लग्न करण्याची शक्यता असे. पण ॲलिस त्या हेतूनं आली

१८ - ॲलिस