पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्या वर्गातली एक मुलगी अवंतिका. खूप हुशार होती. शिकवलेलं चटकन आत्मसात करायची. कधीकधी वर्गाव्यतिरिक्त सुद्धा ती आमच्या घरी यायची. रुस्तुमसुद्धा तिच्याशी गप्पा मारण्यात अगदी रंगून जायचा. ह्यात खरं म्हणजे ॲलिसला मत्सर वाटण्यासारखं काही नव्हतं. तिनं त्याच्या क्षेत्रात कधी रस घेतला नव्हता. मग दुसऱ्या कुणी घेतला आणि त्यामुळे रुस्तुमला तिच्याबद्दल आत्मीयता वाटली तर हिला त्याबद्दल वैषम्य वाटायचं काय कारण?
 काही दिवस अवंतिकेवरून तिच्यात आणि रुस्तुमच्यात काही कुरबूर चालली होती. मग एकदा ती कुठून तरी बाहेरून आली. ही दोघं चहा पीत गप्पा मारीत बसली होती. ॲलिस सरळ अवंतिकेच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली. म्हणाली, "तू कशाला सारखी इथ येतेस ? तुला काय वाटलं तो खरंच तुझ्याशी लग्न करणार आह म्हणून ? मूर्ख पोरी, अगं हे असंच सांगून त्यानं आत्तापर्यंत पन्नासजणी झुलवल्यात. तू फार लहान आहेस. तुझ्या अजाणपणाचा, कोवळ्या वयाचा तो फायदा घेतोय हे कळण्याइतकी सुद्धा समज तुला आली नाही. जा चालती हो इथून. तुझा बाप काय, आजा शोभेल अशा माणसापायी तुझं आयुष्य बरबाद करू नकोस."
 हा कडकडाट ऐकून मी बाहेर आले. अवंतिका विचार गोरीमोरी होऊन रुस्तुमकडे न बघता निघून गेली. मी ॲलिसला म्हटलं, "का एवढा गहजब करत्येयस ? त्याच्या कलाजीवनात घेणारं कुणी त्याला भेटलं ........"
 "कलाजीवन ! फ्रेनी तू तरी अगदी हद्दच करतेस. ती बिचारी कोवळी पोरगी नि तू सारख्याच अजाण आहात अस समजायचं का ? तू एक डोळ्यांवर कातडं ओढून घेतलस तरी जगाला तुझा भाऊ काय आहे हे माहीत नाही असं तुला वाटत ?"
 "जग काय वाट्टेल ते म्हणेल. जगाला काय कुणाची तरी निंदानालस्ती करायला मजाच येते. पण जगाचं ऐकून आपल्याच नवऱ्याचे वाभाडे काढण्यात तुला काय मिळतं ?"
 "मी जगावर विश्वास ठेवीत नाही फ्रेनी. फक्त स्वतःच्या कानाडोळ्यांवर ठेवते. तू माझ्याशी येवढा वाद घालत्येयस तर

१२ - ॲलिस