पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ती खोलीतून निघून गेल्यावर मी त्याला म्हटलं, "तू कशाला तिच्याशी वाद घालीत बसतोस ? ती एक भांडकुदळ आहे, पण तू तरी सोडून द्यायचंस."
 त्यानं आश्चर्यानं विचारलं, "का ? तिच्याशी वादावादी करायला मजा येते."
 म्हणजे फारुखलाही तिनं भुरळ घातलीय एवढं मला समजलं. पुरुष बायकांच्या बाबतीत मूर्ख असतात. बरंसं रूप, छानछोकीनं रहाणं, हसून खेळून चटपटीत संवाद फेकणं ह्यातच आकर्षक व्यक्तिमत्त्वाचं मर्म आहे असं त्यांना वाटतं. नाहीतर रुस्तुम तिच्या नादी लागून आपल्या आयुष्याचं नुकसान करून घेता ना.
 तिच्या स्वभावाचा एक फार तापदायक पैलू आमच्या फार उशिरा लक्षात आला. ती अती मत्सरी होती. अर्थात लग्न झाल्यावर बरीच वर्ष रुरतुम तिच्या भोवतीच रुंजी घालायचा तेव्हा तिच्या मत्सराला काही वाव नव्हता. पण पुढे पुढे एखाद्या बाईकडे नुसतं त्याने रसिक नजरेनं पाहिलं किंवा ती किती सुरेख आहे नाही ? असं सहजपणे म्हटलं तरी ती अकांडतांडव करायची. तो कलाकाराच्या नजरेनं सगळ्यातलं सौंदर्य बघतो ह्याची तिला जाणच नव्हती. एकदा ती म्हणाली, "फक्त तरुण सुंदर मुलींच्यातलं सौंदर्य बघायला कलाकाराची नजर लागत नाही !"
 पुढे ती एकटी रायरेश्वरला जाऊन राह्यला लागली, तेव्हा तिच्या डोक्यातलं हे खूळ जरा कमी झालं. माझी खात्री होती की तिनं तिथे कुणाशी तरी संधान बांधलंय. मी उज्ज्वलाला विचारलं तर तिनं काही पत्ता लागू दिला नाही. ही उजू एकेकाळी माझी छोटी मैत्रीण म्हणून आमच्याकडे अगदी घरातलीच असल्यासारखी येत जात असे. पण ॲलिस आल्यावर तीही मला दुरावली.
 मी विचार केला, असेना का ॲलिसचं एखादं लफडं. त्यामुळे तिनं बिचाऱ्या रुस्तुमला सतावायचं सोडलं तर बरंच झालं. पण रुस्तुम इतका नशीबवान नव्हता. तो काही दिवस कलेची जाण, रसग्रहण आणि समीक्षा शिकवण्यासाठी एक अभ्यासवर्ग घेत असे.

फ्रेनी – ११