पान:अ‍ॅलिस (Alis).pdf/११

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कमी व्हायला लागली. अनेक तपासण्यांनंतर शेवटी हे मानसिक ताणामुळे असावं असा निष्कर्ष काढला गेला. डॉक्टरांनी तिला हवापालट आणि विश्रांतीचा सल्ला दिला. ज्याची सेक्रेटरी म्हणून ती काम करीत होती त्याने तिला प्रवासखर्च आणि पगारी रजा द्यायचं कबूल केलं. माझी खात्री आहे की, तिनं आपल्या उदारपणाचा फायदा घेऊन हिंदुस्थानात जायचं ठरवावं हे त्याला सर्वस्वी अनपेक्षित असलं पाहिजे. पण एकदा पुढे केलेला मदतीचा हात त्याला मागे घेता येईना. तिनं फासे फार हुशारीने टाकले होते. ती हिंदुस्थानात आली ती परत न जाण्याच्या बेतानेच. देव जाणे तिचा आजार तरी कितपत खरा होता. मी तिला पाहतेय तेव्हापासून तिच्या डोळ्यांत कसलाच दोष नव्हता. चष्मा सुद्धा तिला पन्नाशीच्या सुमाराला लागला.
 बऱ्यापैकी रूप आणि चारचौघांत सफाईदारपणे बोलण्या-वागण्याची हातोटी ह्यांच्या जोरावर तिने मुंबईतल्या श्रीमंत समाजात मुसंडी मारली. एका ओळखीतून दुसरी, एका आमंत्रणातून दुसरं असं करीत प्रत्येक पार्टीत, समारंभात ती दिसायला लागली. तिच्यावर फिदा झालेले एकदोन तरुण ब्रिटिश अधिकारी होते. पण प्रेमात पडून ज्याच्या भविष्याची काही शाश्वती नाही अशा पुरुषाशी लग्न करणाऱ्यांतली ती नव्हती. तिनं पुरुषोत्तमदास बाठियाला आपल्या जाळ्यात पकडलं. पण तो तिच्यापेक्षा हुशार निघाला. तो एवढा मोठा उद्योगपती झाला ते काय भोळा भाबडा होता म्हणून ?त्यानं हिला आपल्याबरोबर मिरवलं, तिच्यावर पैसे उधळले आणि शेवटी तिला निरोप देऊन आपल्या तोलाच्या एका उद्योगपतीच्या मुलीशी रीतीप्रमाणे लग्न केलं.
 अ‍ॅलिस निडर होती हे मात्र कबूल करायला पाहिजे. दुसरी एखादी खचून गेली असती. तोंड लपवायला मायदेशी परतली असती. हिनं बाठियासारखा माणूस आपल्यासारखीशी लग्न करणार

४ - ॲलिस