पान:अस्पृश्य -विचार.pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(५ )

झाले. कारण इतक्या विस्तृत भूपृष्ठावर उदात्त तत्त्वांचा बोलबाला लगोलग सुरू झाला. आतां दो-दो हातांनी 'दादा, जरा दमानें घ्या' म्हणावे लागत आहे. कळकाचे कुडण तेंच हयगयखोराचें सरण अशी स्थिति झाली. ही उदात्त तत्त्वांच्या प्रवेशाची आणि प्रसाराची गोष्ट अवघ्या मानव्याच्या हिताची झाली. जो तो न्यायाचा उच्चार करू लागला. आपण कोण आहों हे ध्यानात भरल्यामुळे जो तो स्वयंनिर्णय करूं लागला. सातासमुद्रापलीकडे माजलेल्या कलीला धर्मदंडाशी पुनः करकंडून बांधण्यासाठी व मनुष्ययोनि सुखी करण्यासाठी पृथ्वीवरील अवघ्या लोकांना आग्रहाने आमंत्रणे करणाऱ्यांना मोठा जाच सुरू झाला. "अहो स्वतंत्रतावाले इंग्रज, काढा स्वयंनिर्णय कोठे आहे तो" असें हिंदी लोक म्हणूं लागले. पण कवलाघरावर उभे राहून 'न्याय न्याय' म्हणून ओरडणाऱ्या हिंदी प्रजेच्या शब्दांचा प्रतिध्वनि इंग्लंडकडून येण्याच्या आधीच थेट इटनाक महार, पिरा मांग आणि परशा चांभार यांच्या घरांतून उडूं लागला; त्यांची खोपटी, रकटी बोळू लागली आणि अशा रीतीने ऑस्ट्रियन राजपुत्राचा खून अस्पृश्यांच्या पथ्यावर पडला.
 असो. वरील सर्व लिहिणे जरी मानले तरी या प्रश्नाच्या उलटसुलट बाजू पाहणे; राजकारण, धर्मकारण, तारतम्य, देवघेव इ.दृष्टींनी त्यांचा पूर्ण विचार करणे अवश्य आहे. निरनिराळी मतमतांतरे आपल्या गलबल्यासह पुढे आल्यामुळे निवड करणे पुष्कळदां फार कठीण होऊन बसते, व विषयाचा अभ्यास दूर राहून परस्परांविषयींचे गैरसमज व दुराग्रह मात्र वाढीस लागतात. असें न व्हावें म्हणून पुढील लेख लिहिला आहे. त्यांतील विधानांचा आस्थेवाईक विचार करावा अशी वाचकांना नम्र विनंति आहे.