पान:अस्पृश्य -विचार.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५१ )

म्हणजे तितक्या भूतकाळी शत्रूच्या रुंडमाला धारण करण्याची हौस शूरांना असेल यात शंका नाही.
 हा प्रकार इतका झाला की, नररुंडमाला ही शिवाची निशाणी झाली. त्याचा वेष तर डोंगरी तिरंदाजीला अनुरूप आहे. वाघ, सिंह व हत्ती अशा हिंस्त्र अथवा धिप्पाड पशुंना सहज गारद करून त्यांची विशाल व उबदार चामडी म्हणजे ' चमें ' त्याने आपल्या पुष्ट बाहूंवर टाकून दिली आहेत. त्याच्या भक्तमंडळाचा म्होरक्या अथवा त्याचा पट्टशिष्य म्हणजे आर्यांचा कट्टा दुष्मन् जो रावण तो होय. त्याचे या भक्तावरील प्रेम पुराणप्रसिद्ध आहे. संतापाच्या भरांत शिवाने आपला लिंगच्छेद करून सरोवरांत दडी मारल्यावर आपल्या दैवताची उरलेली खूण या पराक्रमी भक्ताने जपून ठेवण्यासाठी आपल्या दक्षिण दिशेकडील घराकडे नेली आणि त्याची पूजा मनोभावे सुरू केली. ही पूजा दक्षिणभागाला सर्वत्र पसरली आणि लिंगपूजा आर्यांनी अनार्यांपासून घेतली हा तर विद्वानांचा सिद्धांत आहे! युरोपियन वसाहतवात्यांच्या कदाचित् उघड्या झालेल्या मजेदार तांबूस वर्णाच्या मनगटाकडे पाहून काळ्या रानटी स्त्रिया एकमेकींकडे साश्चर्य पाहूं लागल्या हे वाचले म्हणजे, दुर्दैवामुळे रानावनांत भटकावे लागलेल्या भीमाचे आणि रामाचें तें नयनमनोहर आणि शिवाय राजतेजाने झळकणारे रूप पाहून हिडिंबा आणि शूर्पणखा या रानटी स्त्रियांना अभिलाषबुद्धि उत्पन्न व्हावी हे साहजिक दिसते. पण अनार्य स्त्रियांना जसा आर्य पुरुषांचा तसा अनार्य पुरुषांना आर्य स्त्रियांचा मोह पडत असला पाहिजे. दुर्बलांना केवळ इच्छा करण्यापलीकडे काहीच करता येत नसेल; पण रावणासारखे जे जाडे पराक्रमी त्यांनी ठिकठिकाणच्या सुंदर स्त्रिया आपल्या अंतःपुरांत सामील केल्या. हे रावणासारख्या धटिंगण भक्ताला सहजच शोभले. पण शिव हा भक्ता पक्षां आधिक