पान:अस्पृश्य -विचार.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४९ )

मागील हकीकतीवरून असे दिसून येईल की, रामोशाशिवाय इतर सर्व अस्पृश्य आपल्या उत्पत्तीचा संबंध कसा ना कसा तरी शिवाच्या नांवाशी लावतात. कोणी म्हणतो, आम्ही बिल्वदळांतील थेंबांतून निघालो. दुसरा म्हणतो, शिवाच्या मस्तकावरील चंद्रापासून निघालों. तिसरा म्हणतो, मी शिवाच्या आसपासचाच, पण गोहत्त्येचा गुन्हा हातून घडला त्यामुळे मांगपणा अगर महारपणा जन्माला लागला ; बाकी मी त्याच्या भोवतालच्यापैकीच. आणखी एकाचे म्हणणे की,आम्ही शिवाच्या परम भक्तापासून उत्पन्न झालो. एकंदरीने काय की या सर्व कथांतून आपला संबंध शिवाशी लावण्याची त्यांची बुद्धि स्पष्ट दृगोचर होते. ही गोष्ट खरोखरच फार आशाजनक आहे. जे लोक शिवाशी आपला संबंध जडविण्याच्या कामी इतकी आतुरता दाखवितात ते अति प्राचीन काळी केवळ शिवालाच आपलें मुख्य दैवत मानीत असतील अशी कल्पना यावरून मनांत येते. आतां आर्यपूर्व काळांत येथील लोकांचे काय व्याप होते; त्याच्या भाषा, व्यवहार, राज्यपद्धति, उदरभरणाची साधनें कशी होती; ते कोणाला देव मानीत; बाहेरून आलेल्या शूर तेजस्वी व रूपसुंदर अशा आर्यांना आपल्यांत समाविष्ट करून घेण्याचा वकूब त्यांच्या अंगी काही बाबतीत तरी होता की नाही इत्यादि बाबीसंबंधानें इतिहास निश्चयाने असें कांहींच सांगत नसल्यामुळे या दोन विषम संस्कृतींचा परस्परसान्निध्यांत संख्यसंबंध आणि ऋणानुबंध कितपत झाला यासंबंधानें हमखास असे विधान करणे थोडे धाडसाचे वाटेल. पण विस्मृतीच्या या दाट जंगलाच्या झालरीवर शोधकांनी जो साधारण का होईना पण उजेड पाडला आहे त्याच्या आश्रयाने आंत जाण्याला पुसट पुसट पाऊलवाटा दिसतात. त्यांवरून जावयाचे म्हटले तर तत्कालीन अनार्य प्रजेंत शिवाला दैवत मानण्याची बुद्धि असावी असें अनुमान करावेसं वाटते. ' जसे भक्त तसे त्यांचे देव ' या म्हणी-