पान:अस्पृश्य -विचार.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४८ )

नांवांची ती विकृत रूपे आहेत हे इतिहासज्ञांस सांगणे नकोच. मग ती जर त्यांची मूळची नव्हेत तर ती त्यांनी विजेत्या आर्यांकडून घेतली असावीत असा तर्क आपोआप होतो. आर्यांचा लोट जो जों देशभर पसरूं लागला तो तो द्रविडवंशीय असोत अगर त्यांच्याहि पूर्वीचे असोत, मूळचे लोक हतप्रभ होऊ लागले. वसाहतखोर लोक मूळच्या मालकांना गचांडी देतांना सध्या जसे सर्वत्र दिसून येते तसेंच तेव्हां झाले असले पाहिजे. आपल्या गुणांच्या बळावर पहिल्या माणसांकडून त्यांच्या जमिनी या नवीनांनी हिसकून घेतल्या आणि समतेवर हक्क कधीहि न सांगतील इतक्या बेताने त्यांना आपल्या पदरी नोकरीचाकरीस ठेवले. एकदां धनी असलेल्या पण आतां नोकरीचे दास्य पत्करलेल्या लोकांना लवकरच नामांतर करावें लागलें. जो ज्याच्या शेतवाडीवर नोकरीस राहिला त्याच्याच नांवानें विकू लागला. वास्तविक पाहतां हे केवळ अनुमान आहे. पण ते करावयास मागील लेखांत महार शब्दास जे पर्याय शव्द दिले आहेत त्यांवरून आधार मिळतो. महारांना ' भूमिपुत्र ' अथवा ' धरणीचे पूत ' अशी नांवे आहेत, त्यावरून ते स्वतःस या भूमीचे औरस पुत्र समजतात हे उघड आहे. ' मिराशी ' या नांवावरून येथील जमिनीचा मूळ हक्क त्यांचा होता असा बोध होतो. ' थोरल्या घरचे ' या नांवावरूनहि पुरातनत्वामुळे या भूमीवर वडीलपणाने मालकी हक्क सांगणारे असा अर्थ सूचित होतो. एतावता काय की, त्याच्या जमिनी ओरबाडल्या जाण्याच्या आधी तो येथील मालक होता. पण मालकाचा चाकर झाल्यावर त्याला नामशेषत्वहि उरले नाही, आणि त्याचे जिणे केवळ उपरे बनून आर्यांच्या कारभारांत कायमचे लोपून गेले.
 आडनांवांवरून केवळ अनुमान काय म्हणून म्हणतां येते तें पाहिल्यावर त्यांच्या उत्पत्तिकथांवरून काय अनुमाने निघतात ती पाहूं.