पान:अस्पृश्य -विचार.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४६ )

पाहून त्याला महार हे नाव देण्यांत आले, असे कोणी समजतात. पण ही केवळ शब्दावर कोटी आहे हे उघड उघड दिसते. काहीं विद्वानांच्या मतें ' मृताहारी ' म्हणजे मुर्दाड मांस खाणारे या शब्दावरून 'महार' शब्द निघालेला असावा.
 असो. अशा या महारांच्या जातींचे बेटीव्यवहाराला बंद असे पन्नासाहून जास्त विभाग आहेत. महार या शब्दालाच निरनिराळ्या कारणांनी पुढील पर्याय शब्द उत्पन्न झालेले आहेत-अंत्यज, अतिशूद्र, भूमिपुत्र, धरणीचे पूत, भूयाळ, चोखामेळा, धेड, डोंब, हुलसाव, काठीवाले, मेहेतर, मिराशी, परवारी, तराळ, थोरल्या घरचे, वेसकर इत्यादि. भिन्न भिन्न कारणांनी काही चमत्कारिक पोटजातीहि उत्पन्न झाल्या आहेत--जसे गोपाळ महार म्हणजे महारांतील तापसी; मुरळी महार म्हणजे खंडोबाला सोडलेल्या मुलींची प्रजा; गवशी महार म्हणजे व्यभिचारोत्पन्न महार प्रजा; जोगती महार म्हणजे यल्लम्माच्या भगत प्रजा, इत्यादि. सर्व महाराष्ट्रभर महार लोक पसरलेले असून प्रत्येक जिल्ह्यांतील महारांचे दोनपासून अठरापर्यंत पोटविभाग पडलेले सांपडतात. यांच्यापैकी कांहीं शेलकी आडनावे पुढे दिली आहेत--भालेराव, चव्हाण, वाघमारे, वर्तक, यादव, दिवे, गायकवाड, गरुड, जाधव, जोशी, कदम, काळे, लकडे, लोखंडे, मोहिते, मोरे, शिंदे, शिरके, तांबे, इ० लग्ने वगैरे चालविण्यास ब्राह्मण जातो. वैष्णव, शैव, कबीरपंथी, नाथपंथी इत्यादि मतसांप्रदाय असून गुरु, साधू, पंडित, गोसावी, मेंढेजोशी इत्यादि यांना धर्म शिकवितात. महारांचे धंदे म्हटले म्हणजे खजिन्याची नेआण करणे, अधिकाऱ्यांची वेठ करणे, कर भरणाऱ्यांना चावडीवर बोलावून आणणे, गांवकुसवाकडे पाहणे, रस्ते झाडणे आणि गांवशिवाराची हद्द ध्यानात ठेवणे. या सर्व कामांसाठी अल्पसा मोबदला पैशाच्या रूपाने, व बराचसा जमिनीच्या