पान:अस्पृश्य -विचार.pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४१ )

पण ही प्रतिलोम प्रजा संख्येने इतकी अफाट केव्हां व कशी झाली हे त्या पद्धतीवरून नीट कळत नाही. ह्या पद्धतींत श्रेष्ठ-कनिष्ठ जातींच्या गुणाकाराची नुसती कोष्टके आहेत. अमुक जात कशी झाली असे विचारतांच, एका ठराविक कोष्टकावर बोट ठेवावयाचें व तिची जातकुळी त्या कोष्टकांत दिलेल्या श्रेष्ठ-कनिष्ठ जातीच्या नांवाशी भिडवावयाची असा हा प्रघात आहे. शास्त्राविषयी आदर असून सुद्धा ह्या पद्धतींतील शास्त्रीयता न पटेशी व अविश्वास्य वाटते. शिवाय इतिहास आणि वर उल्लेखिलेले शीर्षमापनाचे आधुनिक शास्त्र यांच्या जबानीनंतर तर आपली जुनी पद्धत अगदी टाकाऊ वाटते. असो. आपली धर्मशास्त्र व आधुनिक शास्त्रे यांना बाजूला ठेवून त्या त्या लोकांच्या आपापल्या उत्पत्तीविषयी काय कल्पना आहेत हे पाहिले तर निरनिराळे विचार मनांत उत्पन्न होतात. आणि अति दूरच्या भूतकाळांत दिसणाऱ्या अंधारांतील अस्पष्ट आकृतींवरून आर्यसंस्कृति, व आर्य येथे येण्याच्या आधी चालू असलेली संस्कृति, यांचा परस्परांवर काय परिणाम झाला असेल याविषयी अनेक अनुमाने मनांत उद्भवतात. स्वतःच्या उत्पत्तीविषयींच्या त्यांच्या कल्पना जशा, तशा, त्यांच्या चालीरीती व धंदा याविषयीच्या हकीकतीहि मोठ्या बोधकारक आहेत म्हणून त्या होता होई तो आटपशीरपणाने खाली देतो.
 रामोशी हे काही ठिकाणी अस्पृश्य समजले जातात व काही ठिकाणी स्पृश्य मानले जातात; कांही माहितगार रामोशांचे असे म्हणणे आहे की आपण कोठेच अस्पृश्य समजलों जात नाही. त्यांचा संबंध जमीन कसणाऱ्या कुणबी लोकांशी बराच येत असल्यामुळे व रखवालीची वगैरे कामें त्यांच्याकडेच असल्यामुळे शिवताशिवतीचा प्रसंग अर्थातच जास्त पडतो. दाशरथी रामचंद्र दंडकारण्यांत असतांना आम्ही त्याची सेवा फार एकनिष्ठपणे केली, सीतादेवीला बंधमुक्त करून