पान:अस्पृश्य -विचार.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ४० )

आहे. आर्य तर विशाल मनाचे आणि साधनसंपन्न; त्यांच्यापुढे यांनी कसे टिकावे ? जो जो सासुरवास जास्त होऊ लागला आणि जीवितच संशयांत सांपडू लागले. तो तों हे पहाडी मुलूख आणि निबिड अरण्ये यांत वस्ती करूं लागले व पुढे या नवीन जोमदार लोकांनी कसलाहि पसारा मुलूखभर पसरला तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपले स्वतंत्र जिणे संभाळून राहिले. भिल्लु, कोळी, गोंड इत्यादि लोकांविषयी केलेले हे अनुमान पायाशुद्ध आहे असे म्हणवत नाही. कारण आर्यांचा उपसर्ग पोचण्याच्या आधी हे जमीन कसून आपला उदरनिर्वाह करीत असत असे जेव्हां इतर पुराव्यांवरून सिद्ध होईल तेव्हांच हे अनुमान खरे मानतां येईल. नाहीं तर जेथे जेथें रानटी लोक सांपडतील तेथे तेथे ते शेजारच्या सुधारलेल्या लोकांकडून हाकलले गेले असा सिद्धांत फलित व्हावयाचा. सांगण्याचा मुद्दा इतकाच की, वरील जातींचे लोक आर्यांच्या उपद्रवामुळे नाही, तर आधीपासूनच रानवट व डोंगरकरी असण्याचा संभव आहे.
 असो. हे अनुमान खरे असले तरी प्रस्तुत लेखांतील विषयभूत जातींच्या कुलपरंपरेचा त्यांत खुलासा होत नाही. पण महार, मांग इत्यादि लोकांविषयीहि आधुनिक शास्त्रांचा असाच सिद्धांत आहे की, हे लोक अनार्यच होत अर्थात् आर्यांच्या वसाहती आपल्या प्रांतांत फैलावण्याच्या पूर्वीपासूनहि हे लोक सपाट मैदानांत राहत असत, व जमीन कसून आपला उदरनिर्वाह करीत. जमिनीचे मालक तेच होते, व आर्यांकडून जिंकले गेल्यानंतर त्यांना उपरेपणा प्राप्त झाला. कोणी म्हणतात, ह्या जाति द्रविडियन मानववंशापैकी आहेत. कसेहि असो, ते आर्यवंशीय नव्हेत, याविषयी सर्वांचे एकमत आहे. आपल्या जुन्या शास्त्रकारांच्या जातकुळी देण्याच्या पद्धतीने पाहिले असता हे लोक संकर जातींपैकी आहेत.