तर वाटतो तितका हा प्रश्न अवघड नाहींसेंहि क्षणभर वाटते. असो. वर जी वैगुण्ये म्हणून दाखविली आहेत त्यांचा अस्पृश्यांनी नीट विचार करावा. आपल्याला वाईट म्हणणाऱ्याचा राग यावा हे साहजिक आहे तसा तो आला तरी चालेल, पण त्यांनी कामाला लागावे. अस्पृश्यता घालविण्यासाठी जे काही यत्न होत आहेत व होतील त्यांना अनुकूल भूमि तयार करणे हे ज्यांच्या कपाळी ती आजवर लिहिली आहे त्यांचेच मुख्य कर्तव्य आहे. हे करीत असतांना इतर समाजांशी असलेले आपलें अंतर ज्या कृत्याने वाढेल असे कोणतेंहि कृत्य करण्याच्या मोहास अस्पृश्यांनी बळी पडूं नये, यांत त्यांचे खरें हित आहे.
या पुढे अस्पृश्यांपैकी मुख्य जातींच्या उत्पत्तीची, चालीरीतींची व धंद्याविषयींची थोडीशी माहिती द्यावयाची आहे. अस्पृश्य जातींच्या उत्पत्तीविषयी मागे एके ठिकाणी उल्लेख आलेला आहे. परंतु त्या वेळचें 'प्रस्तुत' निराळे असल्यामुळे त्यांच्या उत्पत्तीच्या केवळ उल्लेखापलीकडे विशेष काही लिहिलें नाहीं; असो. महार, मांग, ढोर, चांभार, व रामोशी या जातींविषयींच लिहावयाचे आहे, कारण मुख्य अस्पृश्य जाति याच होत. निरनिराळ्या जमातींची कितीहि गल्लत झाली असली तरी व्यक्तिव्यक्तीच्या नाकाडोक्याच्या आकारांवरून, ती कोणत्या मानववंशांत हटकून जाऊन पडते, आम्ही सांगू शकतों असें म्हणणाऱ्या आधुनिक शास्त्रांचा असा अभिप्राय आहे की, अस्पृश्यांपैकी बहुतेक जाति अनार्य आहेत. सिंधूपासून गंगेपर्यंत सर्व नद्यांच्या कांठच्या समृद्धीवर उत्तम जोगावलेले आणि विजयाची वेदकालीन ईर्ष्या अंगी पुरी बाळगून असलेले युयुत्सु जसजसे खाली खाली उतरूं लागले, तसतसे त्यांच्या उग्र दर्पामुळे आणि स्वसंरक्षणाच्या सहज इच्छेमुळे हे अनार्य लोक हटूं लागून दऱ्याखोऱ्यांच्या आश्रयाला गेले असावेत असे अनुमान
पान:अस्पृश्य -विचार.pdf/42
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३९ )