पान:अस्पृश्य -विचार.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अस्पृश्यविचार.


गेल्या दोन वर्षांत अस्पृश्यतेच्या प्रश्नाला जोराने उचल मिळाली आहे. राष्ट्रीय सभेने त्याचा पुरस्कार केल्यामुळेच ही गोष्ट घडून आली हे उघड आहे. सर्व हिंदुस्थानचे लक्ष आपल्या कारभाराकडे हटकून ओढून घेणारी अशी ही संस्था असल्यामुळे तिच्या द्वारा ज्या विषयाचा पुकारा झाला त्याला महत्व चढावें हें साहजिक आहे. ज्या भाकरीचा पेंच षट्शास्त्र्यापासून तों महारापर्यंत सर्वांनाच पडला आहे त्या भाकरीचा प्रश्न सोडविण्याचे काम राष्ट्रीय सभा करीत असल्यामुळे सर्वसामान्य जनसमूहाचा ओढा अर्थातच राजकारणाकडे आहे, आणि त्या राजकारणाचा विचार करीत असतांना त्याच्या यशासाठीं ज्या ज्या इतर गोष्टींचा विचार करणे अवश्य आलेले दिसेल त्यांचा निदान विचार करण्यास लोक पुष्कळदां मनाच्या विरुद्धसुद्धा कबूल होतील. आजपर्यंत सामाजिक परिषदा काय थोड्या भरल्या? अस्पृश्यतेसंबंधीं चर्चा, भाषण, ठराव, निषेध इत्यादि प्रकार त्या सभांतून काय थोडे झाले? पण त्यांच्याकडे बहुजनसमाजाने फारसे लक्ष दिले नाही. त्याच्या पसंतीची जी राष्ट्रीय सभा तिने या प्रश्नाचा प्रामुख्याने उल्लेख करतांच सगळीकडे एतद्विषयक हालचाल चालू झाली. असे जरी आहे तरी या हालचालीचे सर्व श्रेय काँग्रेसला अर्पण करणें हे युक्त होणार नाही. महात्मा गांधींनी या विषयासंबंधाने आपल्या भाषणां तुन व लेखांतून स्पष्ट व निर्भीड चर्चा केल्यापासून इकडे लोकांचे