पान:अस्पृश्य -विचार.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३ )

देशांत असलेली कोट्यवधि माणसें वाऱ्यावर सोडून कसे चालेल ! युद्ध उपास्थित झाले तेव्हां घरच्या मुलांच्याहि फौजा बनवून युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्याकडून देशाची सेवाचाकरी करून घेतली. रशियाने बायकांचीहि पलटणे केली आणि पादाक्रांत केलेल्या रशियाचा बाजार हस्तगत करावा म्हणून जर्मन लोकांनी पुरुष नव्हते म्हणून ३६००० स्त्रियांना ऐन युद्धांत अर्थशास्त्राचे शिक्षण दिले ! पण आमच्या येथे पहा माणसे स्वस्त झाली ! कोणी अभाळांतून बॉम्ब टाकून त्यांना जिवे मारावे आणि ही दैवाची कर्कशता ज्यांच्या वाटणीला येते त्यांनीच आपले पांच कोटी बांधव स्पर्शयोग्यहि नाहीत असे समजत रहावें !
 वरील सर्व लिहिणे अस्पृश्यांच्या चिरकालिक महत्त्वाच्या तक्रारीसंबंधाने झाले पण महाराष्ट्रांत ठिकठिकाणी हिंडून प्रस्तुत लेखकानें जे काही पाहिले त्यावरून अगदी आजच्या घटकेला अस्पृश्यांच्या काय तक्रारी आहेत, हे अगदी थोड्यांत खाली देतो. कसले का होईनात, पण जे काही जुने धंदे होते ते नवीन मत हळूहळू पार नाहीसे झाले आहेत आणि मुंबईसारखी ४।५ शहरें सोडली तर नवीन धंद्यांत कोठेहि शिरकाव होत नाही अशी कुचंबणा चांभारांशिवाय बाकीच्या अस्पृश्यांची होत आहे असें स्थूलमानाने म्हणता येईल. एका संस्थानांत तर " यःकश्चित् पोलीस शिपायाची नोकरी सुद्धा आम्हांला देत नाहीत " अशी तक्रार महारांनी केली. एके गांवीं सडका झाडणाऱ्या महारणीला २॥ रुपयांचा मासिक तनखा देण्यांत येतो असे कळले. दुसऱ्या एके ठिकाणी सबंध दिवस काम करून ५ आण्याची मोळी विकल्यावर घरच्या बाळंतीण बायकोला आणि दोन कच्च्याबच्यांना कसे तोंड दाखवावे ह्या विचाराने लाजलेला महार भेटला. दुसऱ्या एके ठिकाणी सरकारीच पण अगदी अळणी अंमलदारापर्यंतचे अधिकारी सुद्धां लांकडे फोडावयास कांहीं एक