पान:अस्पृश्य -विचार.pdf/21

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १८ )

आतांपर्यंत भक्कम कल्पनांवर उभारलेलें असें व्यवस्थित रूप समाजाला देण्याचा यत्नच झाला नाही, अशा अभिनिवेशाने या प्रश्नासंबंधाने कोणीहि लिहूं नये. वरील अवतरणचिन्हांकित वाक्यांत दोन ठळक गोष्टी अंतर्भूत झालेल्या आहेत ; आमची वर्णाश्रमधर्मप्रधान समाजव्यवस्था व पूर्वसंचितानुरुप प्राप्त होणारा पुनर्जन्म हे तत्वज्ञान. ज्या अनेक गोष्टींच्या बळावर हिंदूसमाज सहस्रावधि वर्षे उभा जाहे त्यांपैकी या दोन अत्यंत महत्वाच्या होत आणि याच कारणामुळे अजुनसुद्धां ज्याच्या मनावर थोडा तरी धार्मिक वाङमयाचा संस्कार झाला असेल अगर संस्कारयुक्त गृहस्थितीत ज्याची वाढ झाली असेल अशा प्रत्येक हिंदु मनुष्याचे मन या पूर्वकालीन समाजव्यवस्थेच्यापडापड झालेल्या का होईना - पण भव्य इमारतीकडे मधून मधून गेल्याशिवाय कधीहि राहणार नाही. पृथ्वीवरील कोणतीहि समाजव्यवस्था अनंत कालपर्यत हटकून टिकून राहील असे मानणे म्हणजे मनुष्याला त्रिकालज्ञ बनविणे होय. तो त्रिकालज्ञ तर नाहीच नाही. पण भूतकालीन अनुभव आणि सद्यःकालीन गरजा यांचा मिलाफ घालून मात्र तो आपल्या समाजाची व्यवस्था करीत राहणार. पृथ्वीच्या पाठीवरील अनेक मानववंश इतिहासांत आपली नुसती नांवेंच ठेवून कालवश झालेले आम्हांस दिसतात. ते ज्या देशांत वस्ती करून असत त्या देशांत सध्यांहि त्यांच्याच नांवाचे समाज नांदत आहेत. पण हे आतांचे समाज त्या जुन्या समाजांच्या हाडामांसाचे आहेत अगर निदान त्यांनी निर्मिलेल्या संस्कृतीचे औरस वारसदार आहेत असे म्हणतां यावयाचे नाही. त्या त्या ठिकाणच्या वर्तमानकालीन समाजांना प्राचीनांची नांवें जर चालू ठेविलीच असली तर त्यांत केवळ भौगोलिक यथार्थता आहे इतकेंच समजावयाचे, पण आमच्या येथे अशी गोष्ट नाही. रक्तधारा आणि संस्कृतीचा झरा ही दोनहि जवळ जवळ निर्भेळपणे सारखी चालू आहेत. सहस्रावधि वर्षांच्या तावडी-