पान:अस्पृश्य -विचार.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


(१७)



व ती प्रत्येक समाजांत आहेतहि; मग येथील माणसांनीच एवढा बोभाटा का करावा ? " यावर उत्तर अगदी सोपे आणि सरळ आहे. इतर समाजांत ही नीच कामाची वेठ अमुक एका सबंध जातीच्या माथीं मारलेली नाही. असली कामें करण्याइतपतच बुद्धि व अभिरुचि ज्यांच्या पदरी असेल तेच लोक त्या समाजांत ही कामें करतात व हा धंदा सोडून आपलें दैव काढण्याचा अन्यत्र प्रयत्न करू लागले तर फारशी अडचण त्यांना येत नाही. आपल्या येथे मात्र त्या लोकांना, कदाचित् त्यांच्यापैकी काहींना तरी निदान अधिक चांगले धंदे करता येण्यासारखे असूनसुद्धा याच गोष्टी करण्यावांचून गत्यंतर नसते.
 बोलणे येथेंहि अडले म्हणजे या प्रश्नाला विन्मुख असलेले लोक परत फिरून एका मोठ्या जबरदस्त किल्ल्याच्या आश्रयाला जातात व तेथून वादाला सुरुवात होते. ते म्हणतात, " महारमांग लोक जे हे धंदे करतात ते काय आम्ही म्हणतो म्हणून करतात ? ते त्यांना " सांगितलेले" आहेत. ज्याला त्याला त्यांची कामें लावून दिलेली आहेत; त्याला आम्ही काय करावे? जो ज्या जातीत जन्माला आला असेल त्या जातीचे कर्म त्याने करीत राहावे हा आम्हां हिंदूंचा धर्मच आहे. त्या जातीत तो जन्माला का आला हे त्याने आपल्या पूर्वसंचिताला विचारावें, लोकांवर चरफडून काय होणार ?” या थोड्याशा वाक्यांत आमच्या पूर्वकालीन समाज- विषयक कल्पना, तत्त्वज्ञानविषयक अनुमाने, समाजशासनपद्धति इत्यादि बाबी स्पष्ट प्रतिबिंबित झालेल्या आहेत. एखाद्या ऐदी अजागळाच्या तोंडून जरी हे शब्द निघाले तरी सुद्धा ते विचारांत घेण्यासारखे आहेत; मग जबाबदार शास्त्रांनी त्यांचा जथे उच्चार केला आहे तेथे त्याची हेटाळणी करून चालावयाचे नाही. आपणच कोणी शेकोजी समाजविषयक विचार करावयास निघालो आहोत.