Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 भारतीय परंपरेत पत्नीला अर्धागी म्हणण्याची पद्धत आहे. इंग्रजीत Better half ही संज्ञा वापरली जाते. या पार्श्वभूमीवर 'अर्धुक' हे नाव आपल्याला बरंच काही सांगून जातं. निंबकरांचं हे 'अर्धुक' आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीला एक वेगळा संदर्भ पुरवीत आहे. त्यांच्याच शब्दांमध्ये सांगायचे तर -
 'ह्या संपूर्णपणे स्त्रीविन्मुख समाजात रूढींविरुद्ध आपल्या मनाप्रमाणे वागणाऱ्या स्त्रिया असतात हीच दखल घेण्याजोगी बाब आहे. परंतु असह्य परिस्थितीविरुध्दचा त्यांचा लढा व्यक्तिविशिष्टच राहतो. त्यापलिकडे जाऊन परिस्थितीला कारणीभूत असलेल्या रुढ कल्पना, चालीरीती, कुटुंबरचना ह्यांविरुद्ध उभा राहत नाही. प्रत्येकजण आपली गोष्ट अपवादात्मक आहे, बाकीच्यांनी तसं वागण्याचं कारण नाही असंही सूचित करते.'
 'अर्धुक' मधे आपल्याला अशा बंडखोर स्त्रिया भेटतात. त्यांच्या कहाण्या आपल्याला आजच्या पुरुषप्रधान समाजव्यवस्थेचं चित्र तर दाखवतातच पण स्त्रियांच्या मनोवृत्तीवर पण प्रकाश पाडतात. त्यांच्या लढ्याला सार्वत्रिक-सामाजिक स्वरूप का मिळू शकत नाही? या प्रश्नाच्या उत्तरांच्या दिशाही आपल्याला या कहाण्यांमधेच सापडतात. या उत्तरांचा प्रामाणिकपणे शोध घेतल्यास स्त्री-मुक्ती चळवळीच्या नवीन दिशा आपल्याला सापडतील; या विश्वासानेच हे 'अर्धुक' आम्ही वाचकांच्या हातात सोपवीत आहोत.

एस.