देऊन तिच्या प्लॉटचं तिच्या नावानं साठेखत करून घेतलं. उरलेले सात हजार दोन वर्षांत भरायचे होते. रुक्मिणीनं आणखी एका ठिकाणी काम धरलं. संध्याकाळी सुट्टी झाल्यावर तास-दीड तास एका ऑफिसमधे झाडलोट, धूळ झटकणं, फरशा पुसणं असं काम. दोन्ही पगारातले जरूरीपुरतेच पैसे खर्चुन बाकी सगळे शिलकीत टाकायची.
मधे तिच्या बहिणीचं लग्न झालं पण ती थोडेच दिवस नांदल्यावर घरी पळून आली. आईनं समजावलं, रागवून पाहिलं पण ती बधेना. नक्की कारण सांगेना. ते बरोबर वागवत नाहीत, मी पुन्हा तिकडे जाणार नाही एवढं मात्र ठाम सांगितलं. कुणीतरी रुक्मिणीला विचारलं तू बी का नाही जात माहेरी रहायला, तशी ती म्हणाली, "आपलं त्यांच्याशी पटत नाही." तिनं ऐकलं की तिच्या बापाचा आकडा लागला नि त्याला बरेच पैसे मिळाले, दहाएक हजार. त्यानं तिला काही दिलं नाही एवढंच काय, स्वत:हून सांगितलंही नाही.
एक दिवस एकदम सदा आला. म्हणाला, "मला परत इथे राहू दे. तुझंच बरोबर होतं. त्यांचा सगळ्यांचा नुसता माझ्या पगारावर डोळा आहे. जमिनीतला माझा हिस्सा माझ्या नावावर करून देत नाहीत. आता मी परत तिकडे जाणार नाही." तेव्हा तिला कळलं की तो बापाकडे राहिला होता, त्या बाईकडे नाही. ती त्याच्या बोलण्याला भुलली. शिवाय नाही म्हटलं तरी तिला एकटं रहायचा कंटाळा आला होता. तिनं त्याला परत घेतलं. काही दिवस तो नीट वागला, थोडाथोडा पगार घरखर्चाला दिला आणि एक दिवस ती कामावर गेलेली असताना घरातलं बरंच सामान, भांडीकुंडी घेऊन, अगदी तिनं भरलेलं पीठमीठ सुद्धा घेऊन तो पसार झाला. ती घरी आली तर घर धुवून नेलेलं. भाकरी करून खावी तर करायला पीठ नव्हतं की भाजायला तवा नव्हता. ती संतापून सासऱ्याकडे गेली.
"तुमी माझ्याबरबर चला. त्यान्ला बजावून सांगा माजं सामान मला परत पायजे."
"अगं जा मोठी आली सामानवाली. नवऱ्याला हाकलून दिलंस. अशी कुठं रीत असते का?"
"त्याला तसंच कारन हुतं."
"कारण बिरण मी जाणत नाही. तो काही इथं आलेला नाही. अन् तुला बी मी घरात घेणार नाही. जा चालती हो."