Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/४४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

का म्हून पोसायचं? वायलं राह्यलो की मी बी काम करीन. दोघं मिळवून सुखात खाऊ." शेवटी त्याला पटलं.
 त्यांनी एक खोली भाड्यानं घेतली. रुक्मिणीनं रानात कामाला जायला सुरुवात केली. थोडं थोडं सामान घेत संसाराची जुळवाजुळव केली. हे वेगळे राहिले म्हणून आईबाप, भाऊ सगळे रागावले होते. त्यांनी काही मदत केली नाही.
 ते रहात होते त्याच्या जवळच एक छोटासा प्लॉट विकाऊ होता. तो विकत घेऊन त्याच्यावर एक लहानसं घर बांधायचं स्वप्न रुक्मिणी पहात होती. दोघांच्या पगारातून चांगली शिल्लक पडत होती. पण काही दिवसांनी सदाची नोकरी गेली. दुसरं काम बघतो बघतो म्हणत तो काही करीना. रुक्मिणीच्या एकटीच्या पगारावर संसार चालला होता. अवचित एक दिवस तिला कळलं की सदाला दुसरीकडे काम मिळालं होतं पण तो घरी पैसे न देता त्याच्या ठेवलेल्या बाईची भर करीत होता. तिनं अकांडतांडव केलं तेव्हा त्यानं तिला बदडलं. तिला भारी राग आला. ती म्हणाली, "मला पैसे देत नाही मग माझ्यापाशी कशाला ऱ्हाता? तिच्याकडेच जाऊन ऱ्हावा की." तो म्हणाला, "जातोच. मग पुन्हा यायचा नाही इकडे. बोलवू नको मला मग तुला गरज लागली म्हणजे."
 तो निघून गेला. तो एकदम तिला सोडूनच गेला म्हणून ती हबकली. केवळ ती रागानं जा म्हणाली म्हणून तो गेला असं तिला वाटलं नाही. त्याच्या मनात जायचंच होतं, आपण जा म्हटलं हे नुसतं निमित्त झालं.ती मनातल्या मनात म्हणाली, "जाऊ दे गेले तर. मी येकली ऱ्हाईन. माझं मी कमवून खाईन. मला नाही कुनाची जरवर." सदा गेल्यावर सुद्धा तिचा प्लॉट घेऊन घर बांधायचा बेत कायम होता. फक्त आता तिनं ठरवलं तीन खोल्या बांधायच्या, दोन भाड्यानं द्यायच्या नि एकीत रहायचं. सोबत होईल, नि महिन्याचं महिन्याला उत्पन्न पण मिळेल. हे सगळं करायला किती पैसे लागतील नि एकटीच्या पगारातनं तेवढे शिलकीत पडेपर्यंत किती वर्ष लागतील हा हिशेब ती करीत बसली नाही.

 तिचा एक चुलता होता. लहानपणापासून त्याला तिचा लळा होता. त्याचं घर हेच तिचं खरं माहेर होतं. सणासाठी तो तिला आवर्जून बोलवायचा नि ती जायची. कधी रिकाम्या हाताने जायची नाही. कधी फळं, पोरांसाठी खाऊ, सणासाठी नारळ असं घेऊन जायची. त्या चुलत्याने हजारभर रुपये

॥अर्धुक॥
॥४०॥