पान:अर्धुक (Ardhuk).pdf/४३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रहायचा, पण तिच्या बापाने त्या कुटुंबाची फारशी चौकशी केली नाही. तिचा नवरा सदा तिच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा, चकणा, कायम नोकरी, कामधंदा नसलेला असा माणूस होता. त्याला दर काही दिवसांनी नवं काम बघावं लागायचं. प्रत्येक कामावरून त्याला चुकार म्हणून किंवा बारीकसारीक चोरी केल्याबद्दल हाकलून दिलं जायचं. मग काही दिवस तो घरी बसायचा, मग पुन्हा दुसऱ्या नोकरीचा शोध चालू. त्याचे दोन भाऊ पण तसलेच होते. लोक म्हणायचे ते बेणंच वाईट.
 आपल्या घरी स्वत:च्या पायांनी चालून आलेली मुलगी नुसती राबवण्यासाठी नव्हे तर मारहाण करण्यासाठीही असते अशी सदा, त्याची आई आणि बाप ह्यांची समजूत होती. रुक्मिणी घरी तक्रार घेऊन गेली की आई म्हणायची, "तूच नीट वागत नसशील. तुझं तोंड बी लई वाईट हाय. ज्याच्यात्याच्याशी भांडणं करतेस. असलं सासरी कसं ऐकून घेतील?" मग तिनं माहेरी जायचं सोडून दिलं.
 सगळ्यात भर म्हणून सदाची एक बाई आहे असं तिला कळलं. ती अचंबा करी, हा राती उशीरपरेंत घरी येत नाही नि आला की माझ्यापाशी येत नाही असं का? मग तिला हे कळलं. लग्नानंतर दोन वर्ष झाली तरी हिला मूल नाही म्हणून सासू टोचून खोचून बोलायची. एकदा ही उसळून म्हणाली, "तुमचा मुलगा माझ्यापाशी झोपत नाही मग कशी व्हायची मला मुलं? तिला होतील की." तेव्हा तिच्या सासूनं तिला खूप बदडलं होतं.

 सगळ्या छळाला कंटाळून तिनं नवऱ्याच्या मागे भुणभुण लावली आपण वेगळं राहू म्हणून. तसा त्याचा एक भाऊ वेगळा रहात असे, पण तरी प्रथम सदानं दिला धुडकावून लावलं. तरी हळूहळू तिनं त्याला पटवलं की वेगळं रहाणं त्यांच्या फायद्याचं आहे. वेगळा रहाणारा भाऊ आईबापांना काही मदत करीत नव्हता. दुसरा भाऊ बाहेर काही काम करायचा नाही. घरची थोडी जमीन होती ती कसायचा. त्यात ज्वारी, थोडी कपाशी करून थोडीफार मिळकत व्हायची. तरी पण सदाच्या पगाराचा त्यांना मोठा आधार होता. त्यातनं रुक्मिणीला बाहेर काम करायची परवानगी नव्हती. घरच्या जमिनीवर भरपूर राबायचं. ज्वारी तयार झाली की काढणी करताना हात रक्ताळले तरी चालेल. पण त्यांच्या कुटुंबात बायकांनी दुसऱ्याच्या दारी कामाला जायची पद्धत नव्हती. रुक्मिणीनं नवऱ्याला सांगितलं, "तुमचा भाऊ काई बी करीत नाही. त्याची बायकु बी तसलीच. आपन राबून त्यांना

॥अर्धुक॥
॥३९॥