Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुना नेहमीप्रमाणे गाणं गुणगुणत भराभरा पाय उचलीत आली. तिनं घरात पाय ठेवला नि रेखा म्हणाली, "तो बाबा फिरून हितं आलेला मला नाही खपणार." आपल्या आईनं ज्याच्याशी दुसरा संबंध केला त्याला ती बाप म्हणायची नाही. यमुनेनं पोरीच्या डोळ्यांतला अंगार पाहिला, म्हातारीचे घट्ट मिटलेले ओठ, थिजलेला चेहरा टिपला. तशी हल्ली एरवी सुद्धा पोरगी तिची काही पत्रास ठेवीत असे असं नाही, पण आजचा नूर काही वेगळाच होता.
 "काय झालं?" तिनं आईला विचारलं.
 "व्हायचंय काय? तो हितं आला होता. त्याच्या पाठोपाठ ती अवदसा. नाही नाही ते बोलली. तिचं काय तोंड आहे? संडास आहे नुसता. सगळ्या आळीला फुकटात तमाशा. तुला काय शेण खायचं ते खा पण त्याचे शिंतोडे आमच्या अंगावर नकोत, समजलीस? पुन्हा तो हितं आला तर पोलिसात वर्दी देईन."
 यमुना काही न बोलता घरात आली आणि डोक्यावरचं गाठोडं उतरवून त्यातले कपडे वेगळाले करायला लागली. तिच्या मनात आलं, म्हातारी येवढं फडाफडा बोलली पण माझ्या घरातनं चालती हो नाही म्हणाली. कसं म्हणेल? मग म्हातारपणी तिला कोण संभाळणार?

 यमुनेचं लग्न होऊन चारपाच वर्ष झाली होती तेव्हा एक दिवस ती नवऱ्याला म्हणाली, "माझे वडील थकलेत, त्यांच्यानं काम रेटत नाही. आईला कुणीतरी मदतीला पाहिजे. आपण त्यांच्यापाशी जाऊन राहू." नवरा कबूल झाला नाही. तशा त्याला इतर जबाबदाऱ्या होत्या असं नाही. त्यांची लाँड्री होती पण ती थोरला भाऊ चालवायचा आणि हा नुसता नोकरासारखा राबायला. आईबापांकडे जाऊन राहिलं तर त्यांच्यामागे त्यांचं घर, धंदा मुलीला आणि जावयाला मिळालं असतं. पण त्याला नाही पटलं. एवढा हुंडा देऊन बायको आणली ते काय पुन्हा सासऱ्याकडे जाऊन घरजावई होऊन रहायला? शेवटी यमुना एकटीच मुलीला घेऊन आईकडे निघून आली. त्यांचा परटाचा धंदा होता त्यात ती मदत करायची. नवऱ्याला वाटलं होतं येईल थोड्या दिवसांनी परत. पण ती जायचं नाव काढीना. तो दोनचारदा येऊन गेला तिला न्यायला. ती म्हणे, "पण तुम्हाला इथं येऊन रहायला काय झालं? काय वाईट आहे इथं?" तो त्याला तयारच नव्हता. शेवटी रागावून तो म्हणाला, "तुला बऱ्या बोलानं यायचंय की नाही? मी

॥अर्धुक॥
॥३२॥