पान:अर्धुक (Ardhuk).pdf/३१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धी मुलगी सगळ्यांना जन्मल्यापासून नकोशीच असते. त्यातून तिची आई तिच्या लहानपणीच मेली आणि तिच्या बापाने दुसरं लग्न करून नव्यानं पोरं काढायला सुरुवात केली की तिचा जास्तच अडथळा वाटायला लागतो. नकुसाच्या बापानं तिचं बारा-तेराव्या वर्षी लग्न करून देऊन तिचा अडथळा दूर केला. नवरा तसा बरा होता, पण ही वणनि जरा उजळ, नाकीडोळी नीटस, तर तो हेंगाडा, दात पुढे असलेला. त्याची थोडी जमीन होती पण ती भावाशी भागीदारीत. त्याचं उत्पन्न दोघांपुरेसं काय एकटयापुरेसं सुद्धा नव्हतं म्हणून पोटासाठी शेतमजुरी करावी लागायची. लग्न झाल्यावर सासऱ्याने त्याला जवळच्याच एका बागाईतदाराकडे कायम काम मिळवून दिलं. आणि तो सासऱ्याच्याच गावी खोप बांधून रहायला आला.
 दशरथला दारूचा नाद होता. म्हणजे रोज दारू पिऊन नकुसाला मारहाण करायचा वगैरे असं काही नाही. पण दर आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी तालुक्याच्या गावाला बाजार करायला म्हणून जायचा तेव्हा प्यायचा. बरं, प्यायला तर एकटा नाही प्यायचा. गावातली पाहुणेमंडळी बाजाराला यायची त्यांना बोलावून दारू पाजायचा. त्याच्या ह्या गुणाचा लवकरच बोलबाला झाला आणि अनेक फुकटे येऊन त्याला चिकटायला लागले. फुकटच्या मोठेपणाची त्याला झिंग येत होती पण ह्या व्यसनापायी बराच पैसा खर्च झाल्यामुळे घरी पुरेसं धान्य, भाजीपाला, तेल येईना. उपासमार व्हायला लागली म्हणून नकुसा शेतमजुरी करायला लागली. पण तिचा पगारही दशरथ मागून न्यायचा. ती देत नाही म्हणाली तर तिला बडवायचा. बाप शेजारी असून जावयाला धमकावण्याची कुवत त्याच्यात नव्हती म्हणा, किंवा संसार हा असाच चालायचा, त्यात जगावेगळं काय आहे असं वाटत होतं म्हणून म्हणा, त्यानं ह्या बाबतीत काही दखल घेतली नाही.

 दशरथचं खर्चाचं आणखी एक कलम होतं ते म्हणजे त्याची जिमिन. लांब येऊन राहिला तरी त्यानं जमिनीवरचा हक्क सोडला नव्हता. मग दर पेरणीच्या हंगामाच्या आधी भाड्यानं बैल-औतं घेऊन नांगरट, कुळवणी करायची, शेणखत टाकायचं, पेरणी, काढणी, मळणी ह्या सगळ्याचा खर्च, पुन्हा रजा घेऊन गावी जाण्यासाठी केलेले खाडे ह्या सगळ्याचा हिशेब तो कधी मांडीत नसे. घरी यायची ती दोन-तीन पोती ज्वारी, ती आपल्याला किती महागात पडते हा विचार त्याच्या कधी मनात आला नाही. भाडं भरून

॥अर्धुक॥
॥२६॥