Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/२८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काल डोकावलो तर राजू एकलाच दिसला. म्हणून सहज म्हटलं मामी कुठं गेल्यात. तुमाला राग येत असंल तर नाय इच्यारणार पुना."
 "तसं न्हवं हो," म्हणून सीतेनं माघार घेतली.
 कामाच्या ठिकाणी तमाशा केल्यापासून नंदा तिच्याशी धडपणे बोलली नव्हती. तरी सीतानं जाऊन तिला विचारलं संजय अलिकडे असा का करतो म्हणून. नंदा फटकन म्हणाली, "ते तुलाच ठावं, तुमी बरोबरच काम करता न्हवं? मंग मला कशाला इचारतीस?" नवरा-बायकोचं काहीतरी बिनसलं असेल, आपण कशाला त्यात पडा म्हणून सीता गप्प राहिली.
 थोडे दिवस सुरळीत गेले. मग एक दिवस संजय कामावर नव्हता तर सुट्टी झाल्यावर घरी जाताना सीता दुसऱ्या कुणाच्या सायकलवर चालली होती. हा आडवा आला.
 ती म्हणाली, "गावाहून आला बी इतक्यात?"
 "दिसतोय ना आलेला? एक दिवस चालत घरी गेला असता तर तंगड्या तुटल्या असत्या व्हय तुमच्या? आन तू रे. कुणालाबी चार चौघांच्या देखता सायकलवर घेऊन जातोस. लाज न्हाई तुला?"
 तो पोरगा तडकला. "लाज कुणाची काढता?"
 संजय अस्तन्या सारायला लागला तशी सीता त्याच्या समोर उभी राहिली. "असं काय करता येड्यावाणी? तो माज्या राजाचा मित्र हाय, मला मुलासारका."
 "हां. माहीत हाय मला. मुलासारका. ए, जा फूट. पुना आसं दिसलं तर जित्ता सोडणार न्हाई तुला."
 सीता आता पुरती खवळली, "त्याला येडंवाकडं बोलायचं काम न्हाई."
 "न्हाई कसं? तुला म्हाताऱ्यापासून पोरापर्यंत कुणीबी चालतं. कुणी म्हनं भाऊ, कुणी म्हनं मुलगा. तू कसंबी वागणार पर हिकडं आबरू आमची जाती. हे असलं मी खपवून घेणार न्हाई, बजावतोय."
 सीता ओरडली, "कुणाची आबरू जाईल असं काय बी मी केल्यालं न्हाई. आन तू मला बजावणारा कोण रं? नवरा हायस का माजा?"<बर>  या डोळ्याला डोळा भिडवीत संजय म्हणाला, "तसंच समज."

 तो सायकलवर टांग टाकून निघून गेला. सीता घरी गेली ती धुमसतच. हाताशी एक काठी घेऊन ती न जेवताखाता संजयची वाट बघत बसून

॥अर्धुक॥
॥२३॥