पान:अर्धुक (Ardhuk).pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येणार आहे? संजयचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारलेले. त्याला मामा-मामीनं संभाळलं. तसे त्याचे चार चुलते, त्यांची मुलं अशी सगळी माणसं होती, पण ती त्याच्या बापाच्या वाटणीच्या जमिनीचा हिस्सा गिळून बसलेली. ती कशाला त्याच्याशी आवर्जुन संबंध ठेवणार? तेव्हा नंदा सासरी म्हणजे संजयच्या मामाच्या घरी गेली.
 रानात नि घरात फुकटात राबायला मिळालेली मोलकरीण म्हणून आपल्याला वागवलं जातंय म्हटल्यावर नंदानं आईकडे तक्रार केली. आईनं समजूत घालून तिला परत घालवली. एकदोनदा असं झाल्यावर सीता जाऊन संजयच्या मामीला भेटून आली. तिला गोडीत सांगितलं की पोर लहान आहे, तिला संभाळून घ्या. ती कामाला नको म्हणायची नाही, पण असं राबवून घ्यायची कुठे रीत असते का? पण नंदाच्या मागचा जाच काही सुटला नाही. ती वैतागून आईकडे यायची, मग संजय तिला घेऊन जायचा. शेवटी कंटाळून सीतेनं तिच्याजवळ येऊन रहायला संजयचं मन वळवलं. तसं संजयलाही मामीचं मोठं प्रेम होतं असं नाही. आपल्या सासूनं कशाला ही ब्याद आपल्या गळ्यात घातली असंच तिला वाटायचं. तिला मूल नव्हतं पण संजयला काही तिनं पोटचा असल्यासारखं वागवलं नाही.
 सीता ज्या झोपडपट्टीत रहायची तिथेच तिनं आपल्या शेजारी मुलीला नि जावयाला छप्पर बांधून दिलं. ती जिथे काम करायची तिथला एक गडी सोडून गेला होता त्याच्या जागी संजयला काम मिळालं. नंदाला दिवस गेले. सगळं मनासारखं झालं.
 कामावर येताना नि जाताना सीता संजयच्या सायकलवर डबलसीट बसायची. पोरीला सकाळीसकाळी उठून धावपळ करायला नको म्हणून सीता त्याच्यासाठी भाकरी करून आणायची. भाकरी खाताना किंवा शेजारी काम करीत असले की त्यांच्या गप्पा, हास्यविनोद चालायचे. सीतेची आई एकदा तिला म्हणाली, "सिते, मला ठावं हाय तू माजं ऐकनार न्हाईस म्हणन, पर जावई मान्साशी इक्ती घसट बरी न्हवं. लोकं बोलत्यात " पण सीता म्हणाली, "आपल्या मनात पाप न्हाई तर आपण कशाला भ्यायचं कुणाला?"
 एक दिवस संजय तिला म्हणाला, "मामी, काल रात्री कुठं गेलता?"

 "कदमांच्यात. कंदीमंदी जात असते बसाय बोलायला."

॥अर्धुक॥
॥२१॥