लगना आंदी तस सांगायचं म्हणे तिकड यिऊन ऱ्हा. कशाला? तुमच्या मालकाचा घरगडीम्हणून राबाया?' पण राजूची बायको परत आली नाही आसपासचे लोक म्हणायला लागले. हिच्यापुढे कंची सून टिकणार हाय? सीता म्हणे. "आवं पन मी तिला वाईट वागवायला तिनं हितं ऱ्हायलं तर पायजे ना?" पण लोकांची तोंडं कोण धरणार?
सीतेनं धाकट्या भावाला खोदखोदून विचारलं तेव्हा सगळी हकीगत कळली. त्याच्या मालकाच्या घरी एक लांबची नातलग विधवा आश्रितासारखी राहून स्वैपाक करायची. ही तिची मुलगी. तिचं थोडंफार शिक्षण करून आपल्या अनेक व्यापात कुठेतरी मालकानं तिला एका लहानशी नोकरी दिली होती. पहिल्यापास्नं राजूला लग्न करून तिकडेच न्यायचं असा बेत होता. पण उघड तसं सांगितलं असतं तर सीता तयार झाली नसती. मामाचं मत होतं की राजूनं पुण्याला जावं. त्याच्या जन्माचं कल्याण होईल. त्यानं स्वाभिमान सोडून कुणा बड्या माणसाकडे आश्रितासारखं रहायचं आणि तो फेकील त्या तुकड्यावर जगायचं हे सीतेला पटणं शक्यच नव्हतं. पण लग्राचं हे असं झालं म्हणून राजू हिरमुष्टा झालाय हे तिला दिसत होतं. शेवटी ती त्याला म्हणाली, "जायचं का तुला राजा? जा मामाबरोबर जायचं तर." त्याच्या मनात जायचं होतं पण तिच्यासमोर तसं म्हणायची काही त्याला हिम्मत झाली नाही. तो म्हणाला, " नाही जायचं मला. तिला माझ्याजवळ रहायचं असलं तर येईल इथं. नाहीतर गेली उडत." सीता आनंदानं म्हणाली, "आस्सं! शेवटी मानसाला त्याचं सोताचं काय हवं का नाय? का आपलं बायकूनं खुणावलं की गेलं तिच्यामागं! तिची काय येवढी मिजास हाय? असल्या छप्पन पोरी तुज्या पायावर आणून घालीन."
नंदाच्या लग्नाची मात्र सीतेनं घाई केली. पोरगी शाणी होऊन वरीस झालं. आपण दीसभर कामाला जाणार. ती एकलीच दुसरीकडे खुरपणीला. तिच्यावर कुठवर ध्यान ठिवणार? त्यापरीस लगीन होऊन नवऱ्याच्या घरी गेलेली बरी तिला मिळालेला जावई तिच्या भावाबिवांना तितकासा पसंत नव्हता. पण तिनं विचार केला, काय वाईट आहे? कष्ट करून खाणारा आहे. आपण निराधार, विधवा. आपल्याला काय घर आहे का जमीन जुमला आहे का सरकारी नोकरी आहे म्हणून आपल्या पोरीला कुणी मालदार सांगून