पान:अर्धुक (Ardhuk).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "मी काय वाकडं वागले?"
 ते तुजं तू समजून घे."
 सीता इतर बायांसारखं खालमुंडीनं काम करायची नाही. सगळ्यांशी हसूनखेळून असायची. कुणाचीही मस्करी करायची. एकदा खुरपताना दिसलेले चिकूच्या झाडावरचे सुरवंट एका पत्र्याच्या तुकड्यावर तिनं जमा केले. "मुकादम, उसळीला सोरटं हवी का? लय चांगली लागत्यात म्हनं."
 एकदा एका झाडाच्या बुंध्याशी मातीत पोकळ घरटं करून बसलेली बेडकुळी तिला दिसली. तिनं ती हळूच एका फडक्यात धरून लालाच्या बनियनमधे टाकली. ती उड्या मारायला लागल्यावर लाला जो नाचायला लागला, सगळ्यांची हसता हसता पुरेवाट झाली. हे असलं वागणं सगळ्यांच्या डोळ्यावर यायचं. लोक म्हणायचे, "दोन पोरांची आय हाय, तिनं असं वागायची कुटं रीत असते? बापय मान्सांशी इरभळ हसायचं, बोलायचं, त्यांच्या अंगचटीला जायचं?" एकदा विठोबा म्हणाला त्यानं तिला पेरूच्या बागेत मुकादमाला मुका देताना पाहिलं म्हणून. सीतेनं असं कधी कबूल केलं नाही, पण सगळ्यांचा विठोबाच्या सांगण्यावर विश्वास बसला एवढं मात्र खरं.
 सीतेनं भावाशी वाद घातला नाही. ती फक्त म्हणाली, "बघू." पण मग राजू आजारी पडला नि त्याला नको तो रोग झाल्याचं डॉक्टरनं सांगितलं तशी सीता हबकली. तिनं मुकाट्यानं आलेलं स्थळ पसंत केलं. तिच्या मनात पाल चुकचुकत होती. मुलगी शहरगावची होती. राजूपेक्षा जास्त शिकलेली होती. नोकरी करीत होती. पण राजूला फार आवडली.

 सून आली नि आठवडाभरात माघारी सुद्धा गेली. तिला म्हणे करमलं नाही. पब्लिक नळावरनं पाणी आणायचं, पब्लिक संडास वापरायचा असल्या गोष्टींची तिला म्हणे सवय नव्हती. ती गेल्यावर थोड्या दिवसांनी तिचा भाऊ आला. राजूला म्हणाला, "माझ्याबरोबर चल. आमचे मालक तुला नोकरी देतील." सीता म्हणाली, "कसली नोकरी?" अशीच अडलं पडलं काम करायचं, कुठे बाजार करायचा, कुठे काही. मालकांचं मोठं खटलं आहे, त्यात एक माणूस सहज खपून जाईल. पुढे त्याचं काम पसंत पडलं तर त्याला दुसरं काही करायला वाव मिळेल." सीता चिडून म्हणाली, "राजू येणार न्हाई. तुमी पोरीला मुकाट नांदाया पाठवा. घरजावई पायजेवता त

॥अर्धुक॥
॥१९॥