होती आणि आपण ज्याचं नाव लावतो तो आपला बाप नव्हे हे तिला समजलं होतं.
मुलगा जरा मोठा झाल्यावर त्याला चांगल्या शाळेत घालायला पाहिजे म्हणून ती माहेरच्या गावी येऊन राहिली. मोठं गाव आहे, तो बिघडण्याचा संभव जास्त, म्हणून ती त्याच्यावर कडक नजर ठेवायची. तो शाळेत कधी जातो, घरी कधी येतो, कुणाबरोबर फिरतो हाची सारखी चौकशी करायची. तो शाळेच्या वेळात कुणाबरोबर तरी व्हिडिओ बघायला जातो असं कुणी तरी तिला सांगितलं. त्यावर तिनं त्याला मरेस्तो मारलं होतं. तो रडत रडत म्हणाला, "सगळी तर पोरं बघतात. मग मी गेलो बघायला तर काय बिघडलं?' तिनं त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. "पन साळंच्या येळात कशाला? अब्ब्यास कराया नको? आन आज तू दुसऱ्या पोराच्या पैशावर हिडिओ बगितलास, उद्या तो म्हणला तू मला दाव मंजी तू पैसा कुटून आणणार? माज्या येकलीच्या कष्टावर समद्या चयनी कराया पैसा पुरणार हाय का तुला?"
तिच्या धाकाने राजू थोडी वर्ष शाळा शिकला पण त्याला अभ्यासात फारसं डोकंही नव्हतं आणि त्याचं त्यात लक्षही नव्हतं. सीतेचा एक सावत्र भाऊ राजूपेक्षा चारपाच वर्षांनीच मोठा होता. तो पुण्यात ड्रायव्हरची नोकरी करायचा. रजेवर आला की त्याचा युनिफॉर्म, बूट, कापून सेट केलेले केस ह्या सगळ्याची राजूवर मोठी छाप पडायची. मामासारखी शहरात एखादी नोकरी, मोठा पगार, त्याच्यासारखी राहणी असं स्वप्न राजू पहात होता. पण सीतेच्या मनात त्यानं शहरात जावं असं मुळीच नव्हतं. तिथं तो कसल्या संगतीला लागेल, बहकेल अशी तिला भीती वाटायची. इथं माझ्या नजरेखाली आहे तोच बरा असं वाटायचं.
एक दिवस मामा राजूसाठी स्थळ घेऊन आला. लग्नाच्या विचाराने राजू हरखून गेला पण सीता म्हणाली, "कशाला इतक्यात? त्याला लय शिकायचं हाय अजून."
थोरला भाऊ म्हणाला, "येडी का खुळी तू? त्याला बाप न्हाई धाकात ठेवाया. त्यानं काय तरी येडंवाकडं करण्यापरीस लगीन लावून दे त्याचं.'
"माजा राजा गुणी हाय. तो येडंवाकडं वागायचा न्हाई."
"तो गुणी असून काय उपेग? त्याची आई वागते तसं तो वागणार?"