पण माज्या हाताला यशच का न्हाई?
नवरा मेला तेव्हा ती जेमतेम विशीत होती. पदरात दोन मुलं. दुसऱ्या बाळंतपणाला ती आईकडे गेली होती. तिथं तिनं आपल्या मनानं ऑपरेशन करून घेतलं होतं. ते समजल्यावर तिच्या नवऱ्यानं तिला खूप मारलं होतं. पण त्यावेळी तसं केलं नसतंन तर एव्हाना आणखी दोन पोरं झाली असती.
ती नि तिचा नवरा एका बागाईतदाराच्या वस्तीवर रहायची. नवरा मेल्यावर त्यानं तिला खोली खाली करायला सांगितली. कारण तिथे नवा गडी यायचा होता. सीतेला सासर-माहेरची बख्खळ माणसं होती. पण कुणाच्या तरी आधाराने रहायचं आणि त्यांचं मिंधेपण पत्करायचं हे तिला मानवलं नसतं. तिनं गावात एक खुराडेवजा खोली भाड्याने घेतली.
ती पोरांना घेऊन एकटीच रहाते, कष्ट करून त्यांना संभाळते, तिला कुणाच्या आधाराची गरज वाटत नाही ह्याचं तिच्या सासर-माहेरच्या लोकांना वैषम्य वाटायचं. मग ते तिच्याबद्दल वाटेल ते बोलायचे. कुणी म्हणे, चांगला तगडा जवान गडी व्हता, येकायेकीच कसा काय खलास झाला? हिनंच काय तरी करणी केली आसंल. कुणी म्हणे, हिला येकलीलाच ऱ्हाया पायजे त्याला कारन हाय. मंजी कसं हाय, की तिच्याकडं कोन आलं कोन ग्येलं याचा जाब इच्यारनारं कुनी न्हाई. ह्यावर दुसरं कुणी उत्तर देई, तर काय, दोन पोरांचं न आपलं पोट भरून इक्ती टाकटुकीत ऱ्हाते ती काय निस्ती सोताच्या कष्टावर?
बाकी कुणाच्या बोलण्याकडे सीता लक्ष देत नसे पण तिची आई जेव्हा म्हणाली, "नवऱ्याला चिरडून टाकलंस नि आता झालीस मोकळी कसं बी वागायला," तेव्हा ते तिला जिव्हारी लागलं. ती उसळून म्हणाली, "तो काय किडामुंगी व्हता चिरडून टाकायला? आन तुला हकच कुटं हाय मला असं बोलायचा? तू नवऱ्याला सोडून दुसऱ्याचा हात धरून गेलीस. मला माजा बाप कंदी दिसला बी न्हाई. मी नाव लावलं त्येबी त्याचं न्हाई. का सोडलंस त्याला? कुटं हाय तो? जिता तरी हाय का?"
ह्याला आईनं उत्तर दिलं नाही. सीता तान्ही असताना तिला नि तिच्याहून थोरल्या दोन भावांना घेऊन आई आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्याच्या मागे गेली होती. तो सुद्धा तिच्यापाशी अधनंमधनंच येऊन रहायचा. मोठी झाल्यावर सीतेन कधीतरी थोरल्या भावाकडून ही गोष्ट ऐकली