ती अजिबात बधत नाही असं पाहून शेवटी त्यानं नख्या काढल्या नि धमक्या द्यायला सुरुवात केली. बऱ्या बोलानं गेली नाहीस तर नेसत्या साडीनिशी हुसकून काढीन. मग मात्र तिला भीती वाटायला लागली. तिला माहीत होतं की वेळ आली तर कुणीच तिच्यापाठी उभं रहाणार नव्हतं. पोलिसात तक्रार करून काही उपयोग नव्हता आणि करणार काय? तो धमक्या देतो म्हणून? तो म्हणणार मी नाही देत. तिच्यापाशी पुरावा काय होता? तसं समोरासमोर त्याच्याशी भांडायचं बळ तिच्यात होतं. हुसकून द्यायच्या धमकावणीला ती भीत नव्हती. पण रात्री अपरात्री घरात घुसून त्याने तिला जिवे मारली तर कोण काय करणार होतं? रातोरात प्रेत पुरून टाकून तो मोकळा होईल.
मग काय करायचं? त्यानं देऊ केलेले पैसे घेऊन निघून जायचं? पण तो देणार ती किंमत बाजारभावाच्या आसपास सुद्धा जाणार नाही हे तिला माहीत होतं. त्याहीपेक्षा ते पैसे हातात पडण्याची काहीच खात्री नव्हती. तेव्हा तिनं त्याला झुलवत ठेवून गुपचुप एका मध्यस्थाच्या करवी एक गिऱ्हाईक पाहिलं. तो एक बागाईतदार होता. तिनं त्याला भेटून परिस्थितीची कल्पना दिली. हा गुंड तुम्हाला इथं नीटपणे शेती करू देणार नाही म्हणून बजावलं. तो म्हणाला मी ते बघून घेईन, तुम्ही त्याची काळजी करू नका. माणूस सज्जन होता. बाईला जमीन विकणं भाग आहे हे माहीत असूनही त्यानं नाडलं नाही. त्याला लिफ्टची परवानगी मिळत होती तेव्हा जमिनीतून पुष्कळ उत्पन्न मिळणार होतं. त्यानं रखमाला बाजारभावानं पैसे दिले. पैसे तिच्या हातात न देता आपल्या ओळखीच्या एका ठिकाणी व्याजी लावले आणि दर महिन्याला व्याज मिळेल अशी व्यवस्था केली.
जमीन, घर सोडून जाताना रखमाला फार दु:ख झालं. नवऱ्याच्या मागे जिनं आधार दिला ती जमीन गेली, डोक्यावरचं हक्काचं छप्पर गेलं. नवऱ्याच्या आठवणी जिथे जिवंत होत्या त्या ठिकाणाला ती कायमची अंतरली. भावाकडे जाऊन राहिली तरी ते परक्याचंच घर. तिथे आपल्या मनाप्रमाणे वागता येणार आहे थोडंच? पण शेवटी नशिबात असेल ते कोण टाळू शकणार अशी स्वत:ची समजूत घालून ती नवं आयुष्य उभं करायला लागली. फक्त रात्री एकटी असली की मनातल्या मनात नवऱ्याशी बोलायची. त्याला सांगायची, "तुमी मला चकवून माज्या आंदी गेलासा, पर माज्यावर वाइच ध्यान ठिवा."