Jump to content

पान:अर्धुक (Ardhuk).pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ह्याचा आकस मनात धरून त्याने ती जमीन मुद्दाम पुतण्याला दिली होती. तो आपणहून काही जमीन आपल्याला देणार नाही हे शिवाजीला माहीत होतं. कोर्टकचेऱ्या करायची त्याची इच्छा नव्हती. त्यातन काही पदरात पडण्याची शक्यता नव्हती. शिवाय तिथंच त्यांच्या शेजारानं रहायचं तर त्यांच्याशी वैर कशाला?
 त्यानं साताठ एकरांचा जमिनीचा तुकडा घेतला. जमीन जिराईतच होती, पण त्यानं पानाड्या आणून त्याने दाखवलेल्या ठिकाणी विहीर काढली. त्याला थोडं पाणी लागलं. त्याने थोडे गुंठे जमीन भिजत होती, त्यात भाजीपाला लावला. पाटीत माळवं भरून रखमा शेजारच्या गावात विकायला जायची. बाकीच्या रानात पिकलेली ज्वारी त्यांना वर्षभर खायला पुरायची. शेतावरच भेंडाच्या विटांचं छोटंसं कौलारू छप्पर त्यांनी बांधलं. दावणीला एक गाय, दोन शेळ्या होत्या. गाईचं दूध विकूनही बरे पैसे व्हायचे. कष्ट करून समाधानात दोघं रहात होती. मुंबईतली सगळी वर्ष त्यांनी हेच स्वप्न पहात घालवली होती.
 पण फार वर्ष हे सुख रखमाला लाभलं नाही. पायाला कुदळ लागल्याचं निमित्त होऊन शिवाजी धनुर्वाताने दगावला. रखमाला हा अनपेक्षित आघात सहन झाला नाही. ती भ्रमिष्टासारखी झाली. कुणीतरी भाकरी आणून तिला चार घास खाऊ घालावे, तिला चार समजुतीच्या गोष्टी सांगू पहाव्या. ती सगळ्यांचं सगळं ऐकून घ्यायची पण तिच्या मेंदूवर काही उमटतच नव्हतं. तिच्या भावानं, बहिणीनं थोडे दिवस तरी आमच्याकडे चल म्हणून बोलावलं पण तिनं सपशेल नकार दिल्यावर सुटकेचे निश्वास टाकले. ती म्हणे मी त्यांना सोडून कुठे कसं जाऊ? ती कुणाशीच फारसं काही बोलत नसे, फक्त दुसरं कुणी अवतीभवती नसलं की नवऱ्याशी मात्र बोलायची. एक दिवस त्याने तिच्या स्वप्नात येऊन सांगितलं, "रखमा ऊठ. बाहेर किती काम पडलंय. भेंडीला पाणी घ्यायचंय, कोबीची खुरपण करून खायला घालायचंय, भाजी फुलावर यायला लागली असेल ती काढून बाजारात न्यायला पायजे. तू अशी नुसती बसलीस तर कोण करणार ही सगळी कामं?"

 दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून तिनं पदर बांधला नि ती कामाला लागली. कष्टाची सवय असलेलं आपलं शरीर इतके दिवस नुसतं लोळ्यागोळ्यासारखं बसून कसं राहिलं ह्याचा तिला अचंबा वाटला. नवरा गेल्याचं दु:ख कितीही मोठं असलं तरी त्याच्यामागनं जीव दिला नाही,

॥अर्धुक॥
॥११॥