त्यांना दोघांनाही आता मुंबईचा कंटाळा आला होता. तसं पहिल्यापासूनच त्यांनी ठरवलं होतं, काही वर्ष नोकरी करून पैसे साठवायचे, मग गावी परत जाऊन जमीन घ्यायची. नवससायास करून मूल झालं नव्हतं. खरं म्हणजे त्याच कारणासाठी रखमाला नवऱ्यानं मुंबईला आणलं होतं. मूल होत नाही म्हणून सासू छळायची, मुलगा सुट्टीवर आला म्हणजे दुसरं लग्न कर म्हणून त्याच्या मागे लागायची. एकदा तो गावी आलेला असताना रखमानं डोळ्यांत पाणी आणून सांगितलं, "मला तुमच्याबरूबर मंबईला घेऊन चला. मला हितं ऱ्हायचं न्हाई." तो एका चिमुकल्या खोलीत रहात होता, तेही इतर दोघांबरोबर. त्यात ही कुठं राहणार? जेमतेम झोपण्यापुरती जागा होती. त्यात चूल, भांडीकुंडी कुठं मांडणार? संसार कसा करणार? पण रखमा काही ऐकायला तयार नव्हती. ती म्हणे तुम्ही मला घेऊन चला, मग काय होईल ते होईल. मला एकटीला इथं सोडून गेलात तर मी जीव देईन. ह्या थोराड बांध्याच्या, सुबक सावळ्या चेहऱ्याच्या बायकोवर शिवाजीचा जीव होता. ती म्हणते तसं करायला मागेपुढे पहाणार नाही असं त्याला पटलं. तिच्यावरून घरच्यांशी भांडणं करणंही त्याला शक्य नव्हतं. शेवटी त्यांचा राग पत्करून तो तिला आपल्याबरोबर घेऊन गेला.
रखमाला वाटलं आपला नवरा किती चांगला आहे. आईच्या मनाविरुद्ध त्यानं आपल्याला इथं आणलं एवढंच नाही, पण तो दारू पीत नाही, आपल्यावर उठसूट डाफरत नाही, मारहाण करीत नाही. मग तीही त्याला खूष ठेवायला झटायची, त्याच्या आवडीचं करून घालायची, त्याला पैसे खरचायचं जड वाटायचं म्हणून ती कधीच अमुक पाहिजे म्हणून हट्ट धरायची नाही. काटकसरीनं संसार करायची.
शिवाजीनं वेळेच्या आधीच नोकरी सोडायचं ठरवलं. मूलबाळ नसल्यामुळे पैशाला वाटा फुटल्या नाहीत. शिलकीत पडलेले पैसे आणि ग्रॅच्युइटी मिळून जमीन घ्यायला पुरेसे पैसे होते. शिवाय जमीन कसायची तर शरिराला कष्ट झेपतील अशा वयातच सुरुवात करायला हवी. असा सगळा विचार करून ती दोघं गावी आली.
त्याचे आईबाप वारलेले होते. भाऊ बाहेरगावी नोकरीला होता. बापाची जमीन होती ती चुलतभावाच्या ताब्यात होती. शिवाजी आपल्या मनाविरुद्ध बायकोला घेऊन मुंबईला गेला, मुलगा व्हावा म्हणून दुसरं लग्न केलं नाही