पोहोचू लागला तर त्यांच्या स्पर्धेमुळे विजयी राष्ट्रांतील कारखाने बंद पडू लागतील आणि विजेत्या राष्ट्रांतच बेकारी व मंदीची लाट येईल, "खंडणी नको आणि तुमच्या मालाची आयातही नको," असे म्हणण्याची वेळ विजयी राष्ट्रांवरच येईल.
"आंतरराष्ट्रीय नाणेव्यवस्थेत धनकोच्या मदतीखेरीज ऋणको कधी कर्ज फेडू शकत नाही. एका अर्थाने देशादेशांमधील मोठ्या रकमांची कर्जे फेडता येतच नाहीत किंवा ती फेडून घेणे धनकोंनाच परवडत नाही," असा वरवर विचित्र दिसणारा सिद्धांत केन्सने मांडला. त्याच्या सिद्धांताचा प्रत्यय झपाट्याने आला. जर्मन अर्थव्यवस्था कोसळली; नाण्याचे अवमूल्यन इतक्या प्रचंड वेगाने होऊ लागले, की 'खिशात नोटा घेऊन दुकानात जावे आणि पिशवी भरून माल आणावा.' याऐवजी, 'पोत्यात नोटा भरून न्याव्यात आणि खिशातून माल घरी आणावा...' अशी विपरीत परिस्थिती आली. नाण्याची स्थिरता ही केवळ अर्थकारणातच नव्हे, राजकारणात आणि समाजकारणातही निश्चित नैतिक मूल्यांइतकीच महत्त्वाची असते. शेअर्समध्ये सरकारी कर्जरोख्यांत सुरक्षितपणाच्या अपेक्षेने, गुंतवणूक करणारे भिकारी बनले; उंडगे, टोणगे मजा मारू लागले. पोट जाळण्याकरिता भल्या भल्या घरच्या लेकीसुना रस्त्यावर फिरू लागल्या. खंडणीचे हप्ते चुकू लागले. त्या बदल्यात फ्रान्सने आणखी मुलूख बळकावून घेतला आणि परिस्थिती आणखीनच बिघडत गेली आणि शेवटी, नाझीवाद व हिटलर यांचा भस्मासुर उभा राहिला.
(६ एप्रिल २०००)
◆◆