पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सूडाची भावना होती. आता जर्मनी हरला आहे, शरण आला आहे, तर त्याला असा काही धडा शिकविला पाहिजे, की पुन्हा जर्मन राष्ट्र आणि लोक उठून उभे राहणेच अशक्य झाले पाहिजे, तरच तेही करण्यात तथ्य आहे आणि शांततेला काही अर्थ, असे सगळ्यांनाच वाटत होते.
 व्हर्साय तहात जर्मनीवर शरणागतीच्या अटी लादण्यात आल्या, त्या मोठ्या कडक होत्या. जर्मनीस सैन्य उभारण्यास बंदी झाली; नौदलावर बंदी घालण्यात आली. कोळसा आणि लोखंड यांच्या संपन्न खाणीचे प्रदेश फ्रान्सला जोडण्यात आले. उभे कारखाने जर्मनीतून उचलून फ्रान्समध्ये नेण्यात आले आणि त्याखेरीज, प्रचंड रकमांची खंडणी जर्मनीने दर साल दोस्त राष्ट्रांना पोहोचविली पाहिजे अशा अटी घालण्यात आल्या.
 विजयी राष्ट्रांत सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले. जर्मनीचा त्रास कायमचा सुटला, महायुद्धाचा बदला घेण्यात आला असेही समाधान त्यांना वाटत होते. अशा वेळी केन्सने आपले पुस्तक प्रसिद्ध केले.
 पुस्तकातील प्रमुख मांडणी अशी : जर्मनीवर व्हसार्यच्या तहात शरणागतीच्या ज्या अटी लादण्यात आल्या आहेत, त्यांतून शांतता तर प्रस्थापित होणार नाहीच; पण दुसरे महायुद्धच उभे राहील. कोणत्याही राष्ट्रातील लोकांना कायम अपमानित अवस्थेत ठेवणे शक्य नाही, हे राजकीय सत्य आहे. त्यापलीकडे, व्हसार्यचा तह आणि त्यातील अटी अर्थशास्त्रीय सामान्य तत्त्वांच्या विरुद्ध आहेत.
 जर्मनीने दोस्त राष्ट्रांना द्यावयाच्या खंडणीचा मुद्दा घ्या. खंडणी काही जर्मन नाण्यांत द्यायची नाही. तसे असते तर प्रश्न सोपा होता. नोटा छापण्याचे कारखाने एक दिवस चालविले असते, तर खंडणीची रक्कम पुरी होऊ शकली असती; पण त्या कागदाच्या कपट्यांची काय किंमत आणि त्यांतून दोस्त राष्ट्रांना काय मिळणार? खंडणीची रक्कम आंतरराष्ट्रीय चलनात द्यावयाची आहे. हे चलन जर्मनीस मिळावे कोठून? त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जर्मन मालाची निर्यात झाली पाहिजे; पण निर्यात करण्यासाठी जर्मनीकडे काही राहिलेलेच नाही. खाणीचे प्रदेश फ्रान्सने घेतले; कारखाने नटबोल्टांसहित उचलून नेले. तेथे उत्पादन व्हावे कसे? लोकांना जगण्याचीच जेथे मारामार होणार आहे, तेथे निर्यात करावी कशी?

 समजा, एवढे करून जर्मनीने 'येन केन प्रकारेण' निर्यातीसाठी वरकड उत्पादन तयार केलेच, तर विजयी राष्ट्रे त्या मालाची आयात आपापल्या देशात करून घेण्यास तयार होतील काय? जर्मन माल विजयी राष्ट्रांच्या बाजारपेठांत येऊन

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ९१