आणि आज, जर्मनीची आर्थिक ताकद आणि प्रभाव इतका वाढला आहे, की त्याची झळ अमेरिकन व्यवस्थेसही लागत आहे. जेत्यांनी जितांना सावरायचे हा प्रकार १९४८ मध्ये प्रथम घडला आणि नंतर तो एक नियमच बनून गेला. व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेला काढता पाय घ्यावा लागला, तरी विध्वंस व्हिएतनामचा झाला. पण, त्याची भरपाई करण्याचे अमेरिकेने मान्य केले, हा त्यातलाच प्रकार.
आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील हा मोठा चमत्कारिक भाग आहे. युद्धखोर राष्ट्रांनी शेजारी राष्ट्रांची खोडी काढावी, हल्ले करावे, लढाया कराव्या आणि शेवटी, लढाईत मार खाल्ल्यानंतर शत्रुराष्ट्रांनीच त्यांच्या मदतीला धावावे, हे सगळेच तसे 'फार्सिकल' वाटते. दुसऱ्या महायुद्धानंतर तर 'हरलेले जिंकले आणि जिंकलेले हरले,' अशी म्हणच पडली आहे.
विजयी राष्ट्र पराभूत राष्ट्रांच्या मदतीला धावू लागली, ते काही दयाबुद्धीने नाही, करुणेपोटीही नव्हे, तर शुद्ध स्वार्थापोटीच. हा स्वार्थ कोणता ? या स्वार्थाचे अर्थशास्त्र जगाला पटविण्याचे काम एका छोट्या आकाराच्या पुस्तकाने केले. लेखकाचे नाव केन्स आणि पुस्तकाचे नाव 'शांततेचे आर्थिक परिणाम' एका पुस्तकातील विचारामुळे, मांडणीमुळे जगाच्या इतिहासात फरक घडून यावा असे घडते. त्यातील केन्सचे 'शांततेचे आर्थिक परिणाम' हे मोठे ढळढळीत उदाहरण आहे.
पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पाडाव झाला. फ्रान्स, इंग्लंड इत्यादी दोस्त राष्ट्र विजयी झाली. फ्रान्समधील राजेशाहीच्या काळातील देखणी राजधानी व्हर्साय येथे भव्य प्रासादात जित आणि जेते राष्ट्रांच्या वाटाघाटी सुरू झाल्या. तहाच्या कसल्या, शरणागतीच्याच अटी काय त्या ठरवायच्या होत्या. दोस्त राष्ट्रांना अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धात न पडता, साधनसंपत्तीचा प्रचंड पुरवठा केला होता. जर्मनीची तर पराभवात पुरी वाताहतच झाली होती; पण त्याबरोबर फ्रान्स आणि इंग्लंड या जेत्या देशांच्याही अर्थव्यवस्थेने जबर फटका खाल्ला होता. आर्थिक सुबत्ता काय ती फक्त अमेरिकेतच नांदत होती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विड्रो विल्सन यांच्याकडे सारे जग मोठ्या आशेने पाहत होते.
पण, विड्रो विल्सन यांना युरोपीय प्रदेशात फारसे स्वारस्य नव्हते म्हणा किंवा त्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत कोणी नव्हते म्हणा, तहाच्या अटी युरोपनेच ठरविल्या. जर्मनीने युद्धकाळात दाखविलेल्या क्रौर्याबद्दल, लुटालुटीबद्दल, कत्तलीबद्दल इंग्लंड आणि त्याहूनही फ्रान्समध्ये सर्वदूर विलक्षण संतापाची आणि