Jump to content

पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/80

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्योजकांनासुद्धा एकदा एकत्र व्हायला लागेल.' आयन रॅण्डनी म्हणे पृथ्वीचं ओझं पेलणारा शेषनाग जर कधी आपला फणा हलवू लागला, तर काय होईल याची कल्पना मांडली आहे. एक सावधगिरीची सूचना- चोरांच्या टोळ्या बनतात, लुटारूंच्या टोळ्या बनतात, उद्योजकांच्या टोळ्या बनणं फार कठीण आहे. जे व्यक्तिवादी आहेत, उद्योजक आहेत त्यांनी एकत्र कसं काय जमावं? हिंदुस्थानमध्ये समाजवादाचा डोलारा कोसळून पडला, नेहरूनियोजनाचा फज्जा उडाला आणि तरीदेखील आता नियोजन करणारं माझं मायबाप सरकार कुणी नाही, मी माझ्या पायांवर ताठ मानेनं उभा राहीन आणि स्वत:ची स्वतः प्रगती करीन, असं म्हणण्याऐवजी लोकांच्या झुंडींनी दोन रुपये किलो तांदूळ आणि रुपयाला झुणकाभाकर देणारांना मतं दिली, हे विसरू नका. 'सामना'मध्ये अनंतरावांचं जे यश दाखविलं आहे, ते फार दिशाभूल करणारं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये समूहवादी नियोजनाचा विरोध करणारा एकमेव पक्ष म्हणून आम्ही निवडणुका लढविल्या आणि आमचा इतका फज्जा उडाला! तेव्हा उद्योजकवाद्यांनी हे लक्षात ठेवावं, की झुंडशाहीची साधनं वापरून व्यक्तिवादाचा विजय होईल अशी कल्पना करू नये. पण, 'सामना'मध्ये असं दिसतं, की सर्वसामान्य माणसं उद्योजकता, साहस आणि व्यक्तिवाद यांचं स्वागत करू शकतात. प्रत्यक्षात आजमितीला असं दिसतं, की हे असं फक्त काही विशेष संकटाच्या काळीच होऊ शकेल.
 पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला, तरीसुद्धा पोपट स्वतंत्र होऊ पाहत नाही. आईच्या उदरातून गर्भसुद्धा बाहेर पडू इच्छित नाही, शक्यतो आईच्या कुशीतच राहावं असा प्रयत्न करतो, स्वातंत्र्य हे त्याच्या हिताचं आहे, हे माहीत असूनसुद्धा. दरवाजा उघडून दिला, तर पोपट थोडा उडून जातो आणि पुन्हा वाटीमध्ये डाळ पडायची वेळ येते, तेव्हा डाळ येते का नाही ते पाहायला येतो. सगळा इतिहास स्वातंत्र्याच्या दिशेने जातो, एवढीच तुमची जमेची बाजू आहे. पण, माणसं स्वातंत्र्याकडे जातात ती मागून लाथ बसल्यावरच जातात असं इतिहास सांगतो. ही वस्तुस्थिती दाखवणारी कादंबरी तयार होण्याची वाट पाहूया?

(२१ जून १९९७)

◆◆

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ८१