पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

छिद्र घातक आहे आणि म्हणून जी मंडळी दुसऱ्याच्या छिद्रातून जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण छिद्रविरहित पाहू शकतो अशी कल्पना करतात त्यांची परिस्थिती हत्ती पाहायला गेलेल्या चार आंधळ्यांसारखी होते. सगळे डोळस म्हणतात, आंधळ्यांना अपुरं ज्ञान झालं, आम्हाला मात्र सगळा हत्ती कळला; पण आपण हे कधी लक्षात घेत नाही, की डोळसांना कदाचित् अशी अनेक इंद्रियं नसतील, की त्यामुळे हत्तीचं अधिक सम्यक् दर्शन घेता आलं असतं.
 स्वार्थी लोकांनी काय मोठे उत्पात घडवले हो ? परमार्थाचं नाव घेणाऱ्या आणि समाजाच्या कल्याणाचं व गरिबांच्या भल्याचं नाव सांगणाऱ्या लोकांनी लक्षावधी नाही, कोट्यवधींची डोकी फोडली, शिरच्छेद केले, घरं जाळली, स्त्रियांवर बलात्कार केले. स्वार्थाचं तत्त्वज्ञान नागडेपणानं मांडणारांनीसुद्धा कुणी इतकी भयानक पापं केली नाहीत, जी धार्मिकांनी आणि समाजवाद्यांनी केली. स्वार्थाला नावं ठेवतात म्हणून काही घाबरण्याचं कारण नाही; पण त्याचं तत्त्वज्ञान मांडताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी.
 आपण व्यक्तीच्या अनन्यसाधारणत्वाचं पावित्र्य जपतो आहोत. मी समतावादी आहे का? मी विषयमतानिर्मूलनवादी नाही. मी समतेचा अर्थ कसा समजतो? तुमच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे ? समान का आहोत आम्ही? आम्ही समान याकरिता आहोत, की तुम्ही जितके अनन्यसाधारण आहात, तितकाच मीदेखील अनन्यसाधारण आहे; आमच्या समतेचा पाया आमचे अनन्यसाधारणपण आहे.
 'सामना'मधील अनंतराव आणि अप्पासाहेब यांच्यामधला जो वाद आहे, तो माझ्या मते, उद्योजक आणि कार्यकर्ता यांमधला नाही. मी माझ्या एका लेखात म्हटलं आहे, की देश जितका भिकार तितकी महात्म्यांची संख्या जास्त. संपन्न देशाला महात्म्यांची गरज नाही पडत. हा विचार थोडा समजावून घेऊया.

 मी १९६८-६९ मध्ये माझे वडील वारले, तेव्हा स्वित्झर्लंडमधून परत आलो होतो. दहाव्या-बाराव्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे अन्न जास्त झालं. तेव्हा माझ्या आईनं माझ्या बायकोला विचारलं, 'इतकं उरलं, आता काय करावं? स्वित्झर्लंडमध्ये असं उरलं, तर तुम्ही काय करता?' माझ्या बायकोनं म्हटलं, 'एखादा दिवस खाऊन बघतो, नाहीतर बाकीचं टाकून देतो.' माझी आई म्हणाली, 'म्हणजे असं उरलंसुरलं घेणारी मोलकरीण वगैरे तिकडे नसतात?' म्हणजे एखाद्या देशामध्ये आपल्या उष्ट्यावर जगण्याची अपेक्षा ठेवणारी माणसं असतच नाहीत, ही

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ७८