पान:अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha).pdf/71

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शरम वाटेल,' 'स्वार्थ, पैसा, नफा ही काही पापं नाहीत...' ही असली वाक्यं आणि असला विचार मराठी भाषेला पेलू शकेल असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. मराठी भाषा म्हणजे, आपल्या लहानपणापासून सानेगुरुजींची. 'स्वतःकरिता जगलास तर मेलास, दुसऱ्याकरिता जगलास तर मात्र खरंच जगलास.' मग, त्याच्यातले वेगळेवेगळे नायक निघाले. पत्र्याच्या चाळीत राहणारा मुंबईचा कामगारनेता नायक बनला आणि तत्त्वज्ञान एकूण असं, की 'ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।' गावाकरिता कुळाचा त्याग करावा आणि राष्ट्राकरिता गावाचाही त्याग करावा; महत्त्व समूहाला आहे, समाजाला आहे, व्यक्तीला नाही आणि समाजानंही काय साधायचं आहे?
 न त्वहम् कामये राज्यं । न स्वर्गम् नापुनर्भवम् ।।
 कामये दुःख तप्तानाम् । प्राणीनाम् आर्तिनाशनम् ।।
 दुसऱ्याचं दुःख दूर करण्यातच जन्माचं सार्थक आहे. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आणि एक अशी काहीतरी विचित्र मनोवृत्ती मराठी वाचकांची बनलेली! मराठी सिनेमा लोकप्रिय म्हणजे नावात माहेर आणि डोळ्यातून पाण्याचे पूर वाहवणारी नायिका अशी मराठी सिनेमाची मर्यादा. तशी मराठी कादंबरीचीही एक मर्यादा बनलेली आहे. 'जो जास्त देहदंड भोगतो, जो जास्त कष्ट सोसतो, जो स्वतः जास्त त्रास भोगतो तो श्रेष्ठ.' मग त्याच्या देहदंडातून, आत्मक्लेशातून काही भलं घडत असो किंवा नसो! असा एक 'पीडावाद' ही मराठीची संस्कृती बनली.
 या संस्कृतीतून शिवराज गोर्लेनी आम्हाला पहिल्यांदा बाहेर काढलं आहे, काढण्याचा प्रयत्न केला आहे. अजून त्यांना फार प्रयत्न करावे लागणार आहेत.
 त्यांचं पुस्तक वाचल्याबरोबर मी त्यांना पटकन पत्र लिहिलं आणि त्यांचं कौतुक केलं. त्यानंतर ते जेव्हा मला भेटले त्या वेळी मी त्यांना सूचना केली होती, की एकदा लेखक, प्रकाशक आणि इतर सर्वांनी या प्रश्नावर थोडी चर्चा केली पाहिजे.

 प्रकाशकांनी ही कादंबरी 'लक्षवेधी' आहे असे म्हटले आहे, ही कादंबरी 'क्रांतिकारक' आहे असं म्हटलेलं नाही, स्वतंत्रतावादाचा, उद्योजकतावादाचा, साहसवादाचा हा काहीतरी एक आद्यग्रंथ आहे असंही म्हटलेलं नाही. ही एक 'लक्षवेधी' कादंबरी आहे, तेव्हा लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरिता यावर चर्चा घडून आणावी अशी मी सूचना केली. उशिरा का होईना, दोन वर्षांनी चर्चा घडते आहे त्याबद्दल प्रकाशक व लेखक दोघांचंही अभिनंदन.

'अर्थ' तो सांगतो पुन्हा / ७२