शिवराज गोर्लेंनी त्यांच्या कादंबरीतून थोडा ओबडधोबड असा 'स्वार्थ' शब्द वापरला आहे. मराठीमध्ये एखादी आईन रॅण्ड जन्मली असती, तर तिनं काय शब्द वापरला असता 'व्हर्च्यू ऑफ सेल्फिशनेस' (Virtue of Selfishness)साठी हे सांगता येत नाही; कारण हाही तितकाच ओबडधोबड शब्द आहे. माझ्यापूर्वी जे बोलले त्या सर्वांनी स्वार्थवाद हा थोडा अतिरेक होतो, त्यालाही कुठंतरी बंधन पाहिजे आणि शेवटी माणसाला नैतिकतेचं, सामाजिकतेचं असं काहीतरी बंधन असावं असा एक तडजोडवादी सूर काढलेला दिसला. शिवराज गोर्लेंना हे मान्य करावं लागेल, की जर का त्यांच्या 'सामना' या 'स्वार्थवादा'चा पुरस्कार करणाऱ्या त्यांच्या कादंबरीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी बोलाविलेल्या मंचावरील पाच लोकांपैकी तीनजण असा सूर काढत आहेत, याचा अर्थ या एका कादंबरीने काम झालेलं नाही, अशा अनेक कादंबऱ्या लिहाव्या लागतील!
दोन वर्षे तीन महिन्यांपूर्वी ही कादंबरी प्रसिद्ध झाली. मी काही फारसा चांगला मराठी वाचक नाही. पण, योगायोगानं दोन वर्षांपूर्वी हे पुस्तक माझ्या हाती आलं आणि वाचता वाचता मला आश्चर्य वाटायला लागलं, की आपण खरंच मराठीमध्ये लिहिलेली कादंबरी वाचतोय का एखाद्या इंग्रजी कादंबरीचं रूपांतर किंवा भाषांतर वाचतो आहोत! काही काही वाक्यांवर मी खुणा केल्या आहेत! 'व्यक्तीला खच्ची करून समाज मोठा बनत नाही,' 'जो जो कर्तबगार असतो, जो जो उत्पादक असतो त्याच्याविषयी सर्वसामान्य माणसाला द्वेष वाटतो आणि त्याच्या कर्तबगारीच्या द्वेषातून वेगळीवेगळी तत्त्वज्ञानं काढून ते शोषणाचं एक तत्त्वज्ञान बनवतात,' 'मी स्वतःकरिता जगत नाही आणि माझ्याकरिता दुसऱ्या कुणीतरी स्वतः स्वार्थत्याग करावा आणि मला जगवावं याची मला